Diwalipadwa:देवालय उघडली;मर्यादित भाविकांना दर्शनाचा लाभ…

राज्यातील प्रमुख मंदिरात दर्शनासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक

                                  photo:ट्विटर



भारतीय अलंकार

अकोला: राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज दिवाळी पाडवा पासून धार्मिक स्थळं उघडण्याची परवानगी दिली आहे. यामुळे आज राज्यातील प्रमुख आणि स्थानिक मंदिरात भाविकांनी देव दर्शनाचा लाभ घेतला.  


तुळजापूर

                                      file photo

राज्यातल्या प्रमुख मंदिर प्रशासनांनी गर्दी टाळण्यासाठी विविध उपाय योजना आखल्या आहेत. तुळजापूरच्या कुलस्वामिनी श्री तुळजा भवानी मंदिर प्रशासनाने राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार नियमावली लागू केली.  देवीच्या दर्शनासाठी भक्तांना ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. सध्या रोज केवळ चार हजार भक्तांना दर्शन देण्याची व्यवस्था केली आहे. पहाटे ५ वाजेपासून रात्री ९ वाजेपर्यंत मंदिर  खुले राहणार आहे. 


शिर्डी


शिर्डी साई मंदिरातही दररोज ६ हजार भक्तांना ऑनलाईन नोंदणी केल्यानंतरच श्री साईबाबांचे दर्शन करता येणार आहे. कोविड संदर्भातले आरोग्य नियम पाळून भक्तांनी सहकार्य करावे,असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.


पंढरपूर

                                    फोटो:ट्विटर

पंढरपूर येथे श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने दिपावली पाडवा व भाऊबीज निमीत्त आज  श्री.विठ्ठल व श्री.रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात व मंदिरात फुलांची सुंदर व मनमोहक अशी आरास करण्यात आली आहे. श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर येथे मुखदर्शन सुरू झाले. रोज फक्त १००० भाविकांना दर्शनाचा लाभ मिळणार आहे.यासाठी मंदिर संस्थानच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन बुकिंग करवी लागणार आहे.


आळंदी

                                    फोटो:ट्विटर

श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर येथे माऊलींची पावमान, नित्य पूजा आणि दुधारती करण्यात येवून, मर्यादित भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले केले.


याशिवाय राज्यातील सर्व प्रमुख,स्थनिक मंदिरात पहाटे नित्य पूजाअर्चा करून, भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. आठ ते नऊ महिन्यापासून देवालय बंद होती. मात्र,आजपासून मंदिरात प्रवेश मिळत असल्यामुळे भाविकांच्या आनंदाला पारावार उरला नाही.


अकोला शहर

अकोला शहरातील सर्व प्रमुख मंदिर,देवस्थान पहाटे ५ वाजता पासून भक्तांसाठी खुली करण्यात आली. श्री राजेश्वर मंदिर,मोठे राममंदिर,संतोषी माता मंदिर, बागेतली देवी, श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर, सालासार बालाजी,सप्तश्रृंगी, रेणुकामाता, खाटू श्याम, रामदेवबाबा आदी मंदिरात सकाळी भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली.


श्रीराजेश्वर मंदिर

                                      file photo

आराध्य दैवत श्रीराजराजेश्वर मंदिरात आजपासून भाविकांना दर्शन घेता येत आहे. मात्र,भाविकांना मंदिर गाभाऱ्यात प्रवेश बंदी आहे.केवळ सभा मंडपातून दर्शन घेता येत आहे. ज्या लोकांना सर्दी,खोकला,ताप आहे,अश्याना मंदिरात प्रवेश देण्यात येत नाही. तोंडाला मास्क लावणाऱ्यांना प्रवेश मिळत आहे. 







टिप्पण्या