Crime news: वादातील मध्यस्थी तंटामुक्ती अध्यक्षाच्या जीवावर बेतली; चौघांविरुध्द गुन्हा दाखल

फोनवरील वाद गेला विकोपाला



अकोला: धनत्रयोदशीला सर्वजण दीपावलीच्या उत्सवाच्या कामामध्ये व्यस्त असताना त्याच दिवशी या उत्सवावर विरजण पडल्याची घटना बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम खंडाळा येथे घडली.




एका फोनवरील वादाच्या मध्यस्थीमध्ये भाग घेणे तंटामुक्ती अध्यक्षाचे जीवावर बेतली. त्यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचाराकरीता भरती करण्यात आले.




घटनेची हकीकत अशी की, उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम खंडाळा येथील राष्ट्रपाल पाटील तंटामुक्ती अध्यक्ष हे १३ नोव्हेंबरचे दिवशी चारचाकी वाहनाने गावातीलच चालक नितीन रघुनाथ पाटील यांच्यासोबत बुलढाणा येथे गेल्यानंतर दुपारी ३ वाजताच्या सुमारास गावात परतले. दरम्यान, चालक नितीन रघुनाथ पाटील यांचे फोनवर स्वप्निल शेषराव पाटील यांचा फोन आला असता, त्यांच्यामध्ये वाद सुरू असतानाच हा वाद थांबवण्यासाठी तंटामुक्ती अध्यक्ष राष्ट्रपाल पाटील वय ४२ वर्षे यांनी नितीन रघुनाथ पाटील यांच्या जवळील फोन घेत त्यांनी  विनाकारण वाद होऊ नये, यासाठी स्वप्नील पाटील यांना समजावले. परंतू वाद वाढला.



यावरून गावातच दुपारी ४ वाजताच्या सुमारास शेषराव शिवराम पाटील हे स्वप्निल शेषराव पाटील व पवन शेषराव पाटील या त्यांच्या मुलासह तसेच गावातीलच राहुल उर्फ जयसूर्या देवराव पाटील सर्व राहणार ग्राम खंडाळा यांच्यासह पोहोचत त्यांनी तंटामुक्ती अध्यक्ष राष्ट्रपाल पाटील यांच्यासोबत वाद घातला. या वादामध्ये त्यांना चांगलीच मारहाण केली. यात पाटील डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे भरती करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्यामुळे त्यांना अकोला येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू सुरू आहेत.


या प्रकरणी उरळ पोलीस स्टेशन येथे तंटामुक्ती अध्यक्ष राष्ट्रपाल पाटील यांचा मुलगा आनंद राष्ट्रपाल पाटील यांनी तक्रार दाखल केली असून, शेषराव शिवराम पाटील,स्वप्निल शेषराव पाटील, पवन शेषराव पाटील, व राहुल उर्फ जयसूर्या देवराव पाटील या चौघांविरुध्द भादंवी ३०७,३२४, ३२३, ५०६, ४२७ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उरळ पोलीस करीत आहे.

टिप्पण्या