Coronaimpact: उद्यापासून सनई चौघडा वाजणार; बँड पथक व संगीत कार्यक्रमांना सशर्त परवानगी

आता संगीत वाद्यवृंदमुळे लग्नसमारंभात पूर्वी सारखाच उत्साह दिसणार आहे.

                                      file image




भारतीय अलंकार

अकोला: सात आठ महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्नसमारंभ अगदी मोजक्या उपस्थित पार पडत आहेत. ते सुध्दा विना संगीत. बिन बँड बाजाच्या आवाजात. आता मात्र उद्या गुरुवार १२ नोव्हेंबर पासून विवाह सोहळ्यात बँड पथक आणि संगीत कार्यक्रमाना सशर्त परवानगी शासनाने दिल्याने लग्न मंडपात अधिक उत्साहाचे वातावरण दिसणार आहे. 



कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत महसूल व वन विभागाच्या सूचनेनुसार गुरुवार १२ नोव्हेंबर पासून सर्व बँड पथकांना तसेच लग्नसमारंभामध्ये संगीत कार्यक्रम सुरु करण्याबाबतचे प्रतिबंधात्मक आदेश अटी व शर्तीच्‍या अधिन राहून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंगळवार १० नोव्हेंबर रोजी जारी केले आहे.


मिशन बिगेन अगेन अंतर्गत गुरुवार १२ नोव्‍हेंबर पासून मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्‍यात आल्‍या आहेत.  कोविड-19 चा प्रादुर्भाव व फैलाव होवू नये, या करिता सामाजिक अंतर व इतर आवश्‍यक उपाययोजनेचा अवलंब करुन पुढील नमूद केलेल्‍या अटी व शर्तीनुसार पुढील आदेशापर्यंत सुरु करण्यास परवानगी देत आहे.


अटी व शर्ती 


३० सप्टेंबरच्या आदेशानुसार लग्न समारंभाच्या वेळी उपस्थित असलेल्या ५० व्यक्तींमध्ये बँड पथक व संगीत कार्यक्रम करणाऱ्या सदस्यांचा समावेश असेल,


एकाच ठिकाणी गर्दी न करता सामाजिक अंतर राखुन बँड बाजविणे, संगीत कार्यक्रम घेणे बंधनकारक राहील, 



बैंड पथक व संगीत कार्यक्रम या पथकातील सर्व सदस्यांचे नियमित थर्मल स्कॅनिंग करुन त्यांची नोंद करुन घेणे बंधनकारक राहील. 



तसेच कोरोना विषाणूचा प्रादर्भाव होवू नये याकरिता आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी,  



बँड पथकाकरिता व संगीत कार्यक्रमाला आवश्यक असणारे साहीत्य नियमित निर्जंतुकीकरण करुन वापरणे बंधनकारक राहील, 


कोविड-19 चे अनुषंगाने केन्द्र शासन व राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहील, शासनाने वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या विविध आदेशांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.


सदरचे आदेश १० नोव्हेंबर  पासून  संपूर्ण अकोला शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहतील,असे आदेशात नमूद आहे.



टिप्पण्या