Corona virus vaccine: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट; पहिल्यांदा लसीचे वितरण भारतातच होणार

Prime Minister Narendra Modi visits Serum Institute of India;  For the first time, the vaccine will be distributed in India




भारतीय अलंकार

पुणे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज  सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट देऊन कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक लस विकास, उत्पादन, वितरण, साठवण आणि व्यवस्थापन प्रक्रियेची माहिती घेतली. यावेळी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. सायरस पुनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला, कार्यकारी संचालक नताशा पुनावाला, शास्त्रज्ञ तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


 


प्रारंभी आदर पुनावाला यांनी संस्थेची माहिती दिली. त्यानंतर प्रधानमंत्री मोदी यांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेतील कोविड-१९ प्रतिबंधात्मक लस निर्मितीच्या अनुषंगाने सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांना लस देण्याच्या प्रयत्नांची पूर्वतयारी, आव्हाने आणि नियोजन यांची माहिती शास्त्रज्ञांनी दिली.



लस सर्वसामान्यांना परवडेल अशीच असेल- आदर पूनावाला


सीरम इन्स्टिट्यूटमध्ये उत्पादन होत असलेल्या कोविशिल्ड या कोरोना विषाणू संसर्गावरील लसीचे पहिल्यांदा भारतातच वितरण होणार आहे. ही लस सर्वसामान्यांना परवडेल अशीच असेल, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी पत्रकार परिषदेत दिली.


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज पुण्यात येऊन सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिली आणि कोरोनावरील कोविशिल्ड लसीच्या उत्पादनाबाबत माहिती घेतली. त्यानंतर पूनावाला यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. या भेटीत प्रधानमंत्र्यांसोबत कोविशिल्ड लसीबाबत सखोल चर्चा झाल्याची माहितीही पूनावाला यांनी दिली.



सध्या कोविशिल्ड लस तिसऱ्या टप्प्यात आहे. या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीवर आमचे लक्ष आहे. लसीच्या साठवणुकीची आपल्याकडे पुरेशी आणि सक्षम व्यवस्था आहे. ही लस लोकांपर्यंत पोहोचवण्याची आम्ही तयारी करत आहोत. कोविशिल्ड लसीचे किती डोस लागणार हे भारत सरकारने अद्याप आम्हाला लेखी स्वरुपात कळवले नसले तरी सीरमने जुलै २०२१ पर्यंत ३० ते ४० कोटी लसीचे डोज उत्पादन करण्याची तयारी सुरु केली आहे, असे पूनावाला यांनी सांगितले.



कोविशिल्ड लसीचा आपत्कालीन परिस्थितीत वापर व्हावा, यासाठी परवानगी मिळविण्याकरिता आम्ही पुढील दोन आठवड्यांत अर्ज करणार आहोत. याबाबत आज मोदींशी चर्चा झाली आहे. लसीबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालय निर्णय घेईल. एकदा त्यावर शिक्कामोर्तब झाले की पहिल्यांदा या लसीचे वितरण भारतातच करण्यात येईल. कोविशिल्ड ही लस कोरोनावरील सर्वात प्रभावी लस असल्याचा दावाही पूनावाला यांनी केला.




टिप्पण्या