Akola police: हेल्मेट सक्तीमुळे तरुणाचे वाचले प्राण;पोलिसांचे मानले आभार

शहर वाहतूक निरीक्षक गजानन शेळके यांच्या प्रति व्यक्त केली कृतज्ञाता



 

भारतीय अलंकार

अकोला: शहर वाहतूक शाखा मागील काही दिवसा पासून महामार्ग व प्रमुख रस्त्यावर दुचाकी चालकांना हेल्मेट सक्ती करीत आहे, विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांना दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागत आहे, काही नागरिकांनी या मोहिमेला विरोध सुद्धा केला. परंतु शहर वाहतूक शाखे कडून हेल्मेट सक्तीची मोहीम सुरूच ठेवण्यात आली. या मोहिमेचे सकारात्मक परिणाम समोर येण्यास सुरुवात झाली आहे. आज अकोल्यातील एका युवकाने शहर वाहतूक शाखेच्या हेल्मेट सक्तीमुळे त्याचा जीव वाचला अश्या कृतज्ञातेच्या भावनेतून स्वतः वाहतूक शाखेच्या कार्यालयात येऊन पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांचे आभार व्यक्त केले.



प्राप्त माहिती नुसार वकिलीचे शिक्षण घेतलेले अमित भरत देशपांडे (रा. न्यू तापडिया नगर) एका औषध कंपनी मध्ये वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम करतात. नोकरी निमित्ताने दररोज त्यांना वाशिम अकोला येणे जाणे करावे लागते. त्यासाठी त्यांनी दोन वर्षांपूर्वी मोटार सायकल विकत घेतली होती. त्यावेळी त्यांना हेल्मेट सुद्धा मिळाले होते. परंतु हेल्मेट घालण्याची कटकट नको म्हणून त्यांनी कधीच हेल्मेट घातले नव्हते. 




परंतू,१५ दिवसापासून शहर वाहतूक शाखेने महामार्ग व अकोल्यातून बाहेर जाणारे प्रमुख मार्गावर हेल्मेट सक्ती करून हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली. दंडात्मक कारवाईच्या भीतीने हेल्मेट घालणे सुरू केले होते. 



१८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी काम आटोपून वाशिम वरून अकोल्याला परत येत असतांना पिंजर गावा जवळ पुढे चालणाऱ्या दोन मोटारसायकली अचानक स्लिप होऊन पुढे घासत गेल्या. त्यामुळे देशपांडे यांनी ब्रेक दाबताच मागून येणाऱ्या मोटारसायकलची धडक लागल्याने ते खाली पडून काही अंतर मोटारसायकल सह रस्त्यावर घासत गेले. 

परंतू त्यांनी हेल्मेट घातलेले असल्याने किरकोळ खरचटले व थोडा मुका मार लागला. परंतू समोरील दोन्ही मोटार सायकलस्वार यांनी हेल्मेट घातलेले नसल्याने त्यांचे डोक्यावर गंभीर इजा झाल्याने ते जागेवरच बेशुद्ध झाले. त्यामुळे त्यांना अंबुलन्स बोलावून अकोल्याला उपचार कामी पाठविण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. 



आपला जीव शहर वाहतूक शाखेच्या हेल्मेट सक्ती मुळेच वाचल्याची भावना ठेवून अमित देशपांडे यांनी स्वतः शहर वाहतूक कार्यालयात जाऊन पुष्पगुच्छ देऊन शहर वाहतूक निरीक्षक गजानन शेळके व शहर वाहतूक शाखेचे आभार व्यक्त केले. तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक यांना प्रत्यक्ष भेटून  अकोला पोलिसांचे हेल्मेट सक्ती बद्दल आभार व्यक्त करणार आहेत.



टिप्पण्या