school Education: सुवर्णपर्णाच्या माध्यमातून कोरोनाची जनजागृती; पाचमोरी शाळेचा अभिनव उपक्रम

नवे अमूल्य दान, तुमचे प्लाझ्मा दान', 'नारा देते पाचमोरीची शाळा, नियम पाळा कोरोना टाळा', 'ताकद नियम पाळण्याची, कोरोना शाबूत ठेवण्याची', 'सोने घ्या दसऱ्याचे, नियम पाळा कोरोनाचे




अकोला: भारतीय संस्कृतीत दसरा या सणाला खूप महत्त्व आहे. या सणाला आपट्याची पाने एकमेकांना देऊन सोनं घ्या -सोन्यासारखे राहा, असा संदेश दिला जातो. दुर्गुणांचा नाश करा, तसेच सत्मार्ग स्वीकारण्याची शिकवण दिली जाते. नेमके या पानांचे पावित्र्य ओळखून पंचायत समिती अकोला अंतर्गत जिल्हा परिषदेच्या पाचमोरी शाळेने सुवर्णपर्णाचा मान असलेल्या आपट्याच्या पानातून कोरोना संदर्भात प्रतिबंधात्मक शासकीय नियमांचे पालन करून महाराष्ट्र शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्रमांतर्गत जनजागृतीचा अनोखा उपक्रम राबविला आहे.


शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा शेजोळे व युनेस्को स्कूल क्लबचे विद्यार्थी लॉकडाऊनपासून कोरोना जनजागृती अभियानात आरोग्यदूत म्हणून प्रभावी भूमिका निभावत आहेत. आगामी काळात येणाऱ्या कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेपासून आपले व कुटुंबियांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी दसऱ्याच्या मंगलमय सणानिमित्त पालकांना व ग्रामस्थांना शासन नियम पाळण्याची भावनिक साद घातली. 


मनिषा शेजोळे यांच्या संकल्पनेनुसार आपट्यांच्या पानांवर कोरोना जनजागृती संदेश लिहून हा संदेश गावातील घराघरांत प्रत्यक्ष जाऊन वाचून दाखविला. यावेळी कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची तसेच आपल्या पाल्यांना घरी शैक्षणिक वातावरण निर्माण करून देण्याची गावकऱ्यांना विनंती केली गेली. या विनंतीला मान देऊन पालकांनीही शासनाच्या नियमांची अंमलबजावणी करून पाल्याच्या शिक्षणाची जबाबदारी पार पाडू, असे सांगितले. 


याप्रसंगी नियमांचे पालन करून शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा  ताई भोयर, पदाधिकारी  निशा जाधव,  सुनिता इंगळे,  रेखा जाधव,  उज्वला जोशी, सहकारी शिक्षिका  सुरेखा पागृत यांच्यासह पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.


सोने घ्या दसऱ्याचे, नियम पाळा कोरोनाचे'

'नवे अमूल्य दान, तुमचे प्लाझ्मा दान', 'नारा देते पाचमोरीची शाळा, नियम पाळा कोरोना टाळा', 'ताकद नियम पाळण्याची, कोरोना शाबूत ठेवण्याची', 'सोने घ्या दसऱ्याचे, नियम पाळा कोरोनाचे', 'आपले आरोग्य आपल्या हाती, नियम पाळून देऊ कोरोनाला माती',  'पाचमोरी शाळेची एकच वाट, कोरोनाचा करू समूळ नायनाट', 'पाचमोरी शाळेची पुकार, कोरोना करू हद्दपार', 'शाळा बंद शिक्षण सुरू, कोरोना जनजागृती करू' इत्यादि जागृतीपर घोषवाक्य संदेश सुवर्णपर्णावर लिहून गावात वाटप करून यावेळी विजया दशमीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.


युनेस्को कोरोना  जनजागृती 

मनिषा शेजोळेंच्या मार्गदर्शनात कोरोना बचाव कार्यशाळा, मास्क निर्मिती, व्हिडिओ क्लिप्सद्वारे कोरोना प्रतिबंधात्मक उपायांचे विस्तृत मार्गदर्शन, कोरोनाची लक्षणे व उपाययोजनांच्या माहितीपत्रकांचे वाटप, कोरोना जनजागृती रॅली, युनेस्को कोरोना  जनजागृती चित्रकला स्पर्धा, रांगोळीच्या माध्यमातून यापूर्वीही  शाळेतर्फे जनजागृती करण्यात आली आहे.  

टिप्पण्या