IPL2020: चेन्नई सुपरकिंग्जच्या पराभवाची हॅटट्रीक ; सनराईजर्स हैदराबादचा चेन्नई सुपरकिंग्जवर ७ धावांनी विजय

DREAM11 IPL 2020, MATCH 14: CSK VS SRH 



               IPL-2020

                रोजनिशी

       ✍️नीलिमा शिंगणे-जगड

Sunrisers Hyderabad beat Chennai Super Kings by 7 runs.


Chennai Super Kings defeat hat trick (photo:IPL/BCCI)


आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्ज अत्यंत खराब कामगिरी करीत   आहे. दुबईच्या मैदानावर शुक्रवारी झालेल्या सामन्यात सनराईजर्स हैदराबादने चेन्नई सुपरकिंग्जवर ७ धावांनी विजय मिळविला. तेराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जच्या पराभवाची देखील हॅटट्रीक झाली. 


सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला हरवल्यानंतर चेन्नईला राजस्थान, दिल्ली आणि शुक्रवारी हैदराबाद संघाकडून पराभव स्वीकारावा लागला. 



हैदराबादच्या गोलंदाजांनी या सामन्यात भेदक मारा करीत चेन्नईच्या फलंदाजांना खेळ बहरण्यासाठी संधीच दिली नाही. शेवटच्या षटकांत धोनी-जाडेजाने फटकेबाजी करत सामन्यात थोडी फार रंगत आणली. मात्र,शेवटी चेन्नईचे हे प्रयत्न ७ धावांनी कमी पडले. चेन्नईचा संघ १५७ धावांच उभारू शकला.

१६५ धावांचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली होती. सलामीवीर शेन वॉटसन भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर लवकरच माघारी आला.  संघात पुनरागमन करणारा रायुडूही या सामन्यात फारशी कामगिरी करू शकला नाही. केवळ  ८ धावा करुन परतला . यानंतर  फाफ डु-प्लेसिसही झटपट धाव घेण्याच्या नादात धावबाद झाला. यानंतर अनुभवाची भक्कम शिदोरी जवळ असलेले खेळाडू रविंद्र जाडेजा आणि महेंद्रसिंह धोनी यांनी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. परंतु, धोनी-जाडेजा जोडीने  संघाची पडझड थांबवली तरीही अपेक्षित धावगती मिळवू शकले नाही. शेवटच्या षटकांत जाडेजाने फटकेबाजी करून अर्धशतकही केले. परंतू नटराजनच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करण्याच्या नादात तो ५० धावांची खेळी करुन बाद झाला. यानंतर धोनीच्या खांद्यावर संघाची मदार होती. धोनीने फटकेबाजी करत संघाच्या खात्यात धावा जमा करण्याचा  प्रयत्न केला. परंतू दुबईचे उष्ण वातावरण त्याला साथ देत नव्हते. अशा परिस्थितीत देखील अखेरच्या षटकांत धोनीने संघाला विजयासाठी २८ धावांच्या आव्हानापर्यंत आणून ठेवले. भुवनेश्वर कुमारं १९ वे षटक टाकताना दुखापतग्रस्त झाल्यामुळे हैदराबादकडून अखेरचे षटक अब्दुल समदने टाकले. समोर धोनीसारखा फलंदाज असतानाही समदने आश्वासक कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. हैदराबादकडून टी.नटराजनने २, भुवनेश्वर कुमारने १ तर अब्दुल समादने १ गडी बाद केला.



तत्पुर्वी, चेन्नईने भेदक मारा करत हैदराबादला १६४ धावांवर रोखले. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, चेन्नईच्या गोलंदाजांनी सुरेख मारा करत हैदराबादच्या फलंदाजांना जखडून ठेवलं. वॉर्नर-बेअरस्टो-पांडे, विल्यमसन हे हैदराबादचे महत्वाचे फलंदाज झटपट माघारी आल्याने संघ महत्वाच्या षटकांत धावा करु शकला नाही. परंतू प्रियम गर्ग आणि अभिषेक शर्मा या युवा फलंदाजांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत संघाला आश्वासक धावसंख्येचा टप्पा गाठून दिला. हैदराबादकडून प्रियम गर्गने नाबाद ५१ धावा केल्या.


पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या सनराईजर्स हैदराबादची सुरुवात खराब झाली होती. सलामीवीर जॉनी बेअरस्टो दीपक चहरच्या भन्नाट इनस्विंगवर क्लिन बोल्ड होऊन माघारी परतला. यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि मनिष पांडे यांनी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. ही जोडी मैदानावर टिकेल असं वाटत असतानाच शार्दुल ठाकूरने मनिष पांडेला माघारी पाठविले. पांडेने २९ धावा केल्या. यानंतर ठराविक अंतराने डेव्हिड वॉर्नरही झेलबाद झाला. सीमारेषेवरच फाफ डु-प्लेसिसने वॉर्नरचा सुरेख झेल घेतला. वॉर्नरने २८ धावा केल्या.


चेन्नईच्या गोलंदाजांनी पहिल्या चेंडूपासून हैदराबादच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला होता. ज्यामुळे महत्त्वाच्या षटकांमध्ये हैदराबादच्या फलंदाजांवर दबाव आला. केन विल्यमसनही प्रियम गर्गसोबत एकेरी धाव घेताना धावबाद झाला. महत्वाचे सर्व फलंदाज माघारी परतल्यानंतर अभिषेक वर्मा आणि प्रियम गर्ग जोडीने जबाबदारी  अंगावर घेत फटकेबाजी  केली. दोन्ही फलंदाजांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. शेवटच्या षटकात दीपक चहरने अभिषेक शर्माला बाद करून हैदराबादला आणखी एक धक्का दिला. मात्र, प्रियम गर्गने अखेरपर्यंत झुंज देत अर्धशतक गाठले. चेन्नईकडून दीपक चहरने २ तर शार्दुल ठाकूर आणि पियुष चावलाने प्रत्येकी १-१ गडी बाद केला.


Brief Scores; Sunrisers Hyderabad 164/5 (Priyam Garg 51*, Abhishek Sharma 31; Deepak Chahar 2/31) beat Chennai Super Kings 157/5 (Ravindra Jadeja 50, MS Dhoni 47*; T Natarajan 2/43) by 7 runs







टिप्पण्या