Christian community:ख्रिश्चन समाजाच्या मालकीची शेतजमीन हडपण्याचा डाव!

बोरगावमंजू ठाणेदाराचे आरोपींना अभय.
साखळी उपोषण करण्याचा ख्रिश्चन धर्मियांचा इशारा.
जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना निवेदन सादर. 
Intrigue to grab farmland owned by Christian community!



अकोला: राष्ट्रीय महामार्ग सहावरील मौजे काटेपूर्णा, कुरणखेड येथील दि ख्रिश्चन अ‍ॅण्ड मिशनरी अलायन्स चर्च ऑफ इंडिया, महाराष्ट्र सिनड पी.टी.आर.डी-१ या संस्थेच्या मालकीच्या ४२ एकर जमिनीवर अनधिकृतपणे कब्जा करण्याचा प्रयत्न करणारा आरोपी गुरुचरणसिंग अंधरेले आणि त्याचे गुंड साथीदार तसेच या सर्व आरोपींना पाठीशी घालणारे बोरगावमंजू पोलिस स्टेशनचे ठाणेदार हरीश गवळी यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी या मागणीसाठीचे निवेदन बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील समस्त ख्रिश्चन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आणि पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांना सादर करण्यात आले. 



कारवाई न केल्यास येत्या शनिवार, १० ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन आणि साखळी उपोषण करण्याचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. डॉ. प्रमोद इंगळे आणि धर्मगुरूंनी यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून परिस्थितीशी अवगत केले.


मौजे काटेपूर्णा, कुरणखेड ता.जि.अकोला येथे सदर संस्थेची सुमारे ४२ एकर शेतजमीन गट क्र.३३० क्षेत्रफळ १० हेक्टर ३६ आर व गट क्र. ६४ क्षेत्रफळ ६ हेक्टर ११ आर आकारणी ४६ स्थित आहे. दि खिश्चन अ‍ॅन्ड मिशनरी अलायन्स चर्च ऑफ इंडिया, महाराष्ट्र सिनड पी.टी.आर.डी-१, अकोला यांच्या मालकीची व ताब्यातील ७/१२ उताऱ्यावर नमूद शेतजमीन आहे. प्रभुदास दौलतराव इंगळे, रा.म्हाडा कॉलनी, अकोला यांना सदर संस्थेच्या वतीने विश्वस्थांनी सदर शेत जमिनीचा वाहितीचा करारनामा सन २०१९ ला व विशेष मुखत्यार पत्र सन २०२० साली दिले आहे. 


आरोपी गुरुचरणसिंग अंधरेले हा खिश्चन संस्थेच्या मालकीच्या व ताब्यातील शेतजमिनीवर अनधिकृतपणे व बळजबरीने अतिक्रमण करुन ताबा मिळविण्याचा प्रयत्न करीत असून, त्याने कट कारस्थान रचून खोटे व बनावटी दस्तावेजही तयार केले आहेत. संस्थेच्या मालकीच्या शेतजमीन, मालमत्तेचा अपहार केल्याबाबत तसेच कुरणखेड येथील शेतजमिनीवर संस्थेच्या नावाचा लावलेला लोखंडी बोर्ड चोरून त्याची विल्हेवाट लावल्याबद्दल गुरुचरणसिंग अंधरेले व त्याचे गुंड साथीदार तसेच शेतातील पिकाची रखवाली करून पिकाचे उत्पन्न घेणारे विष्णू पवार आणि राजू भेंडकर यांच्याविरुध्द कठोर कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात बोरगावमंजू पोलिस स्टेशनला लेखी तक्रार दाखल केली आहे. 


परंतू, बोरगाव मंजू पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांनी आरोपींवर कोणतीही कारवाई न करता त्यांना मोकाट सोडले असल्यामुळे आरोपी गुरुचरणसिंग अंधरेले व त्याचे गुंड साथीदार यांच्यापासून आमच्या जीवाला धोका असून, बोरगाव मंजूचे ठाणेदार हे आरोपींना पाठीशी घालीत असल्याने आरोपींसह ठाणेदारावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. सदर आरोपी आणि ठाणेदार यांच्यावर त्वरित कारवाई न झाल्यास या मागणीसाठी ख्रिश्चन समाज बांधव आणि भगिनी येत्या शनिवार १० ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करू, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. 




निवेदन देताना ख्रिश्चन धर्मगुरू रेव्हरंड आशिष बिजोरीकर, याकोब इंगळे, शैलेश जगधने, राहुल हिवरे, दीपक शेजे, मोजेस वानखडे यांच्यासह डॉ. प्रमोद इंगळे, सुनील डेव्हीडसन, अनुप डेव्हीडसन, विलास चौथमल, जॉन्सन वरघट, रॉबिन्सन वरघट, प्रभूदास इंगळे, तुषार मडामे, शलमोन कदम, स्वरूप घाटगे, जेम्स स्वामी, रविकांत डेव्हीडसन, सुशील डेव्हीडसन, निलेश पवार, सुधीर डेव्हीडसन, सुधीर प्रधान, वैभव चव्हाण, जॉय भिसे, देवानंद साळवे आदिंची उपस्थिती होती.

टिप्पण्या