BJP:यशोमती ठाकूर यांनी राजीनामा द्यावा; भाजपा प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांची मागणी

मध्यंतरी त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना राडा करण्याचा जाहीर मंत्र दिला होता. एक वेळ राजकीय आंदोलनात भावनेच्या भरात हातून  गुन्हा घडतो, ते ही एकवेळ आपण समजू शकतो. पण कर्तव्याची चाड बाळगणाऱ्या व आग्रही पोलिसाच्या थोबाडीत हाणणे, कितपत योग्य आहे?




मुंबई: एका महिलेच्या मागे आता अख्खा भाजप लागेल, अशी प्रतिक्रिया देऊन न्यायालयाने दोषी ठरवलेल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न चालवला आहे. स्वतःच्या दुष्कृत्याला लपवण्यासाठी असा केविलवाणा प्रयत्न करण्यापेक्षा नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी आमदारकीचा व मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी टीका भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी आज पत्रकार परिषदेत केली.


या वेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष निवेदिता दीघडे, शहर अध्यक्ष किरण पातूरकर, भाजपा महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष अर्चना पखान, लता देशमुख, शिल्पा पाचघरे, संध्या टिकले, मीना पाठक, मंगेश खोंडे, प्रशांत शेंगोकार, दीपक खताळे प्रामुख्याने उपस्थित होते.



पुढे बोलताना शिवराय कुळकर्णी म्हणाले, यशोमतीताईंना अमरावती जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यांनी जे काही दुष्कृत्य केले तो म्हणजे निव्वळ आणि निव्वळ सत्तेचा माज होता. २५ मार्च २०१२ साली राज्यात काँग्रेसचे शासन असताना घडलेला हा प्रसंग आहे. वाहतुकीसाठी बंद असलेल्या रस्त्यावर म्हणजे वनवे वर आपली कार अडवली म्हणून उल्हास रौराळे या पोलिसाला त्यांनी मारहाण केली होती. ड्युटीवर असलेल्या वर्दीधारी पोलिसाला मारहाण करण्याच्या प्रकरणी यशोमतीताईंना भाजपाने नव्हे न्यायालयाने दोषी ठरवले आहे. भाजपा नेत्यांवर तोंडसुख घेताना त्या वारंवार मारण्याची भाषा बोलतात. संस्कार आडवे येतात नाही तर मारले असते, असे उद्गार त्यांनी नुकतेच काढले होते. 


मध्यंतरी त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना राडा करण्याचा जाहीर मंत्र दिला होता. एक वेळ राजकीय आंदोलनात भावनेच्या भरात हातून  गुन्हा घडतो, ते ही एकवेळ आपण समजू शकतो. पण कर्तव्याची चाड बाळगणाऱ्या व आग्रही पोलिसाच्या थोबाडीत हाणणे, कितपत योग्य आहे ? एरवी संविधानाचा बाऊ करून राजकारण करणाऱ्या यशोमतीताईंना पोलिसाला मारताना संविधानाचा विसर पडला होता का ? एका पोलिसाला मारहाण करण्यात दोषी ठरवल्या गेलेली व्यक्ती समाजातील पीडितांना न्याय देईल, अशी अपेक्षा कशी करायची ? हा सर्व घटनाक्रम पाहता यशोमतीताईंवर कुठले संस्कार आहेत, हे जनतेला स्पष्टपणे दिसले आहे. त्यावर अधिक खुलासा करण्याची गरज नाही.


अपमानित झालेल्या पोलिसावर प्रचंड राजकीय दबाव आणला गेला. त्यात एक पोलीस कर्मचारी बळी पडून तो फितुर झाला. मात्र, उल्हास रौराळे राजकीय दबावाला बळी न पडता त्याने न्यायासाठी दिलेला लढा प्रशंसनीय आहे.


या संपूर्ण प्रकरणात यशोमतीताई यांनी संपूर्ण पोलीस खात्याची व त्यांना निवडून दिलेल्या जनतेची विनाशर्त माफी मागावयास हवी होती. केलेल्या चुकीची कबुली देण्याचा मोठेपणा त्यांनी दाखवावयास हवा होता. मात्र, सत्तेच्या मस्तीत दंग असलेल्या यशोमतीताईंना माणुसकीचा विसर पडला होता. पोलिसांना मारणाऱ्या, अधिकाऱ्यांना मनसोक्त शिवीगाळ करणाऱ्या, वारंवार हिंसक भाषा वापरणाऱ्या यशोमतीताई राज्याच्या मंत्री म्हणून जनतेला न्याय कसा देतील, हा आमचा सवाल आहे. स्वतःचे उघड झालेले पाप झाकण्यासाठी भाजपावर दोषारोपण करणे या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. त्यांनीच नैतिकता गमावली असल्याने त्यांनीच राजीनामा देण्यास हवा. भाजपच्या नावाने उलट्या बोंबा मारल्याने आपले पाप लपत नाही.


या राज्य सरकारात एक मंत्री अनंत करमुसे नामक युवकाला स्वतःच्या बंगल्यावर आणून बेदम मारहाण करतो. एक मंत्री गुन्हेगार म्हणून न्यायालयात शिक्षेस पात्र ठरतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हताशपणे नैतिकता गमावलेल्या सहकाऱ्यांसोबत सरकार चालवतात, यावरून त्यांची हतबलता सिद्ध होत असल्याचे शिवराय कुळकर्णी म्हणाले.



३महिने शिक्षा व १५ हजार ₹ दंड

महिला व बालकल्याण मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी अमरावती अंबादेवी मंदिरा जवळ उल्हास रौराळे या पोलिसाला मारल्याच्या प्रकरणी जिल्हा न्यायालयात आरोप सिद्ध. ३ महिने शिक्षा आणि १५ हजार रुपयांचा दंड. त्यांचा कार चालक आणि सोबतचे दोन कार्यकर्ते देखील दोषी. फितुर होऊन साक्ष देणारा एक पोलिस देखील शिक्षेस पात्र. 



टिप्पण्या