banjaradharmaguru: नरेंद्र मोदी, उध्दव ठाकरे, अजित पवार, पंकजा मुंडे यांनी श्रीरामराव महाराजांना वाहिली श्रद्धांजली

डॉ. रामरावबापू महाराजांनी केवळ बंजारा समाजाच्याच नव्हे तर, अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी कार्य केलं. अनिष्ठ रुढी, प्रथा, परंपरा, अंधश्रद्धेविरोधात प्रबोधनाची चळवळ उभारली



भारतीय अलंकार

मुंबई, दि. ३१ :  बंजारा समाजाचे श्रद्धास्थान तपस्वी डॉ. रामराव महाराज  यांच्या निधनाने केवळ बंजारा समाजाचेच नव्हेतर सर्व समाजाचे नुकसान झाले आहे. श्रीरामराव महाराज यांना सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पित केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पंकजा मुंडे यांनी आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या. 



रामराव बापू महाराज त्यांच्या समाज सेवेबद्दल स्मरणात राहतील-नरेंद्र मोदी


"श्री रामराव बापू महाराजजी त्यांच्या समाजसेवेबद्दल आणि श्रीमंत आध्यात्मिक ज्ञानासाठी स्मरणात राहतील.दारिद्र्य आणि मानवी दुःख दूर करण्यासाठी त्याने अथक परिश्रम घेतले. काही महिन्यांपूर्वी मी त्यांना भेटण्याचा मान मिळविला. या दु: खाच्या वेळी माझे विचार त्याच्या भक्तांसोबत आहेत. ओम शांती.",अश्या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री रामराव महाराज यांना श्रद्धांजली वाहिली. यासोबतच महाराजांच्या सोबतच्या भेटी प्रसंगीचे छायाचित्र देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमातून शेअर केले.




समाजाचे अध्यात्मिक मार्गदर्शक छत्र हरपले-उध्दव ठाकरे


मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आपल्या शोकसंदेशात म्हणतात, बंजारा समाजाचे श्रद्धास्थान ,धर्मगुरू डॉ. रामरावजी महाराज यांच्या निधनाने खूप दुःख झाले. डॉ. रामरावजी महाराज यांनी संत सेवालाल महाराज यांचा वारसा चालवताना समाजातील अनिष्ट प्रथांवर नेहमीच  प्रहार केला आणि जनजागृतीचे मोठे कार्य केले. श्री पोहरादेवी तीर्थक्षेत्राचा, तसेच राज्यातील तांड्याच्या विकास व्हावा, यासाठी ते आग्रही होते. 



त्यांच्यासारख्या थोर विभूतीच्या निधनाने केवळ बंजारा समाजाचेच नव्हे तर सर्व समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचे महत्वपूर्ण काम त्यांनी केले. व्यसनापासून दूर राहावे, शिक्षण घ्यावे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. श्रद्धास्थान, धर्मगुरु म्हणून त्यांचा अनुयायांना मोठा आधार होता. त्यांच्या निधनामुळे अध्यात्मासह, समाज सुधारणेच्या क्षेत्रातील मार्गदर्शक छत्र हरपले आहे. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर  चालत राहणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल. डॉ. रामरावजी महाराज यांना त्रिवार वंदन.



बंजारा समाजाचे धर्मगुरु रामरावबापू महाराज यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून भावपूर्ण श्रध्दांजली


संत सेवालाल महाराजांचे वंशज तथा बंजारा समाजाचे धर्मगुरु, आदरणीय रामरावबापू महाराज यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. 


आदरणीय डॉ. रामरावबापू महाराजांनी केवळ बंजारा समाजाच्याच नव्हे तर, अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी कार्य केलं. अनिष्ठ रुढी, प्रथा, परंपरा, अंधश्रद्धेविरोधात प्रबोधनाची चळवळ उभारली. व्यसनमुक्तीसाठी लढा दिला. सामाजिक सुधारणा व मानवतेच्या कल्याणाला वाहून घेतलेलं, संत सेवालाल महाराजांच्या कार्याचा, विचारांचा वारसा पुढं घेऊन जाणारं, ते ऋषीतुल्य व्यक्तिमत्वं होतं. त्यांचं निधन ही देशाच्या सामाजिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक, मानवतावादी चळवळीची मोठी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.


उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, वाशिम जिल्ह्यातील श्रीपोहरादेवी संस्थानचे प्रमुख असलेल्या धर्मगुरु आदरणीय डॉ. रामरावबापू महाराजांनी संपूर्ण जीवनभर बंजारा बांधवांच्या आणि मानवतेच्या उन्नतीसाठी कार्य केले. सामाजिक व सुधारणावादी कार्याचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या निधनानं केवळ बंजारा बांधवांचंच नव्हे तर, राजकीय, सामाजिक क्षेत्रात विविध माध्यमातून योगदान देणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांचं मार्गदर्शक नेतृत्वं हरपलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी शोकभावना व्यक्त केल्या.


त्यांचे कार्य सदैव प्रेरणा देतील-पंकजा मुंडे


बंजारा समाजाचे आद्य धर्मगुरू संत रामराव महाराज पोहरादेवीकर, यांच्या दुःखद निधनाने एका महान तपस्वीला आम्ही समस्त भक्तगण मुकलो आहोत. त्यांचे विचार, तळागाळातील लोकांच्या उत्थानासाठी त्यांनी केलेले कार्य सदैव प्रेरणा देत राहतील, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !! ,अशा शब्दात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


पोहरादेवी येथे उद्या अंत्यसंस्कार


पोहरादेवी संस्थानचे मठाधिपती, बंजारा समाजाचे  धर्मगुरु, रामराव बापू महाराज यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी शुक्रवारी निधन झाले.संत सेवालाल महाराज यांच्या कुळातील ते बंजारा धर्मगुरू होते. मुंबईत लीलावती हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. काही दिवसांपासून श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचारही करण्यात आले. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी शुक्रवार, ३० ऑक्टोबर  रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. यावेळी त्यांच्यासोबत महंत शेखर महाराज होते. रामराव महाराज हे १९४८ मध्ये पोहरादेवी संत सेवालाल महाराज संस्थानच्या गादीवर बसले होते. रामराव महाराज यांच्याविषयी बंजारा समाजात अपार श्रद्धा असून, त्यांच्या पार्थिवावर सोमवारी पोहरादेवी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.



हे सुध्दा वाचा:बंजारा समाजाचे धर्मगुरू रामराव बापू महाराज यांचे मुंबईत निधन; पोहरादेवी येथे उद्या अंत्यसंस्कार








टिप्पण्या