Shivsena: जिल्हाधिकाऱ्यांना 'माझं प्रशासन, माझी जबाबदारी' समजवून सांगण्याची गरज- विजय मालोकार Need to explain 'My administration, my responsibility' to the District Collector - Vijay Malokar

जिल्हाधिकाऱ्यांना 'माझं प्रशासन, माझी जबाबदारी' समजवून सांगण्याची गरज- विजय मालोकार

Need to explain 'My administration, my responsibility' to the District Collector - Vijay Malokar



अकोला : जिल्हा प्रशासनानं व्यापारी संघटनांच्या माध्यमातून अकोलेकरांवर लादलेला जनता कर्फ्यू लोकांनी अक्षरशः लाथाडला आहे. अकोलेकरांनी नाकारलेला जनता कर्फ्यू हे जिल्हा प्रशासन आणि जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचा नैतिक पराभव असल्याची टीका शिवसेना माजी जिल्हाप्रमुख विजय मालोकार यांनी केली आहे. जनता कर्फ्यू नाकारत अकोलकरांनी जिल्हा प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा एकप्रकारे निषेधच केला असल्याचा टोला मालोकार यांनी लावला आहे. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात महत्वाकांक्षी 'माझं कुटूंब, माझी जबाबदारी' अभियान सुरू करण्यात आलं. या अभियानातून कोरोनाशी लढण्यासाठी प्रत्येक माणसापर्यंत शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि समाज पोहोचावे,  हा उदात्त हेतू या अभियानातून  ठेवला गेला. मात्र, या अभियानाच्या मुळ उद्देशालाच अकोला जिल्हा प्रशासनाने हरताळ फासला आहे. 



अकोल्यात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आणि त्यांच्या प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे हे अभियान अकोला जिल्ह्यात कुठेच दिसलं नसल्याचा आरोप मालोकार यांनी केला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी कुणा-कुणाला विश्वासात घेऊन या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केलेत, हे जनतेसमोर ठेवण्याचं आवाहन मालोकारांनी जिल्हाधिकाऱ्यांना केलं आहे. 



आता जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आणि त्यांच्या ढेपाळलेल्या प्रशासनाला आता 'माझं प्रशासन, माझी जबाबदारी' ही भूमिका शिकविण्याची वेळ आल्याचं विजय मालोकार म्हणालेत.
       


अकोला जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनामूळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारची जिल्ह्यात बदनामी होत आहे. ही भूमिका विरोधी पक्षाच्या इशाऱ्यांवर अकोला जिल्हा प्रशासन करतं आहे का?, याची चौकशी करण्याची मागणी सरकारकडे करणार असल्याचं मालोकार म्हणालेत. 



या आठवड्यात कोरोना काळात अकोला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आणि जिल्हा प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करणार असल्याचं मालोकार म्हणालेत. यामुळेच पापळकर यांची अकार्यकारी पदावर बदलीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं मालोकार म्हणालेत.

टिप्पण्या