Public curfew:व्यापाऱ्यांनी पुकारलेला जनता कर्फ्यु शासनाचा नाही; जनतेने यात सहभागी हाेऊ नये- प्रकाश पोहरे

व्यापाऱ्यांनी पुकारलेला जनता कर्फ्यु शासनाचा नाही; जनतेने यात सहभागी हाेऊ नये- प्रकाश पोहरे



* हा तर सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचा प्रकार



अकाेला : सहा महिन्यांपासून लाॅकडाऊन च्या अतिरेकामुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे. त्यातच अाता पुन्हा विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजच्या वतीने शुक्रवारपासून पाच दिवस जनता कर्फ्यु घोषित करण्यात आल्याने सर्वसामान्य जनतेच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या हा जनता कर्फ्यु शासन व प्रशासनाचा नसून जनतेने या जनता कर्फ्यु मध्ये सहभागी हाेऊ नये, असे आवाहन किसान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार प्रकाश पाेहरे यांनी केले आहे.



काेराेना संसर्गाला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात यापूर्वी प्रशासनातर्फे पुकारलेल्या प्रत्येक लॉकडाऊनला जनतेने सहकार्य केले. परंतू ज्या वेळी राजकीय पुढाऱ्यांनी जनता कर्फ्युचे आयोजन केले, त्यावेळी कर्फ्युचा बोजवारा उडाला. 


दरम्यान, दोन महिन्यांच्या कालखंडात व्यापारी संघटनांनी पुन्हा २५ ते २९ सप्टेबर दरम्यान जनता कर्फ्युचे आयोजन केले आहे. काेराेना संसर्गाच्या नावाखाली सातत्याने लाॅकडाऊन करून शेतकरी, मजुर, कामगारांसह सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. लाॅकडाऊनमुळे आधीच सहा महिन्यांपासून सर्वसामान्यांना कुटूंबांचे पालन-पाेषण कसे करावे असा ज्वलंत प्रश्न पडला. 


त्यातच पुन्हा-पुन्हा लाॅकडाऊन करून गरीब जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार हाेत आहे. या जनता  कर्फ्युला सर्वसामान्य जनतेकडूनही विराेध हाेत आहे. या बंदला प्रशासनातर्फे कोणताही आदेश देण्यात आला नसला तरी बंद संदर्भात फक्त आवाहन करण्यात आल्याने, आता या बंदला जनता प्रतिसाद देणार की, फज्जा उडविणार हे दिसून येणार आहे.


बाऊ करू नका 

दरवर्षी जुलै, ऑगस्ट महिन्यात व्हायरल फिव्हरचे रुग्ण वाढतात. मात्र, काेराेनाचा संसर्गाचा बाऊ करीत वारंवार जनतेला वेठीस धरणे याेग्य नाही. नागरिकांनी वैयक्तीक व परिसर स्वच्छता ठेऊन नियमित काळजी घेतली तर व्हायरल फिव्हरचा धाेका टाळू शकताे. गेल्या सहा महिन्यात काेणाताही आजारी व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचा काेराेनामुळेच मृत्यू झाला अशा अफवा पसरविल्या जात असून काेराेनाचा बाऊ करून जनतेमध्ये भितीचे वातावरण पसरविल्या जात असल्याचे प्रकाश पाेहरे म्हणाले.

टिप्पण्या