Private hospital: खाजगी रुग्णालयांतील कामकाजाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा The Collector reviewed the functioning of private hospitals

खाजगी रुग्णालयांतील कामकाजाचा  जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा 



The Collector reviewed the functioning of private hospitals


अकोला,दि.15: शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा वाढता ताण लक्षात घेता कोविड-19 च्या अनुषंगाने जिल्ह्यातील काही खाजगी रुग्णालयामध्ये उपचार करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. या खाजगी रुग्णालयांतील कामकाजाचा आढावा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी घेतला. 


यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्षा प्रतिभाताई भोजने,  आमदार अमोल मिटकरी, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेद्र लोणकर, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच खाजगी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांची उपस्थिती होती.


खाजगी रुग्णालयातील तक्रारीची आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून दखल


खाजगी रुग्णालयात अनेक रुग्णाच्या नातेवाईकाच्या तक्रारी येत असल्याबाबत आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले. काही रुग्णाकडून शासनाने खाजगी रुग्णालयाकरीता निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दर आकारण्यात येत असल्याचे तक्रारी येत आहे. याबाबत संबंधित रुग्णालयानी जास्त शुल्क न आकारता सामाजिक बांधीलकी समजून या कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत रुग्णाना व त्यांच्या नातेवाईकांना सहकार्य करावे, 


तसेच रुग्णालयात अनेक रुग्ण प्रतिक्षायादीवर असल्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण इत्तर जिल्ह्यात उपचारासाठी जात असल्याचे दिसून येत आहे. ही बाब निश्चितच जिल्ह्यासाठी भुषणावह नाही. तरी अशा रुग्णांना योग्य मार्गदर्शन करुन त्याची स्थिती समजून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठवावे व बेड उपलब्ध झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी भरती करुन घ्यावे, अशा सूचना आमदार अमोल मिटकरी यांनी दिल्यात.


खाजगी रुग्णालयांनी रुग्णांची प्रतिक्षायादी व दर दर्शनी भागात लावावे


खाजगी रुग्णालयांनी दर्शनी भागी रुग्णाची प्रतिक्षायादी व शासनाने निश्चित केलेल्या उपचार दराची यादी लावावी, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी  यांनी खाजगी रुग्णालयाच्या अडीअडचणी समजून घेतल्या.


जिल्ह्यात ऑक्सीजनची कमतरता नाही


जिल्ह्यात ऑक्सीजनची कुठेही कमतरता पडणार नाही याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आहे, असे सांगून ऑक्सीजनबद्दल काही अडचणी असल्यास नोडल अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्याशी संपर्क साधावा, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. परंतु आपल्या रुग्णालयाला लागणारा ऑक्सीजनाचा वापर आगाऊ जिल्हा प्रशासनाकडे नोंदवावा. तसेच पुरेसे ऑक्सीजनचे रिकामी सिलेंडरचा साठा उपलब्ध ठेवावा, अशा सूचना यावेळी देण्यात आला.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुरेसे बेड उपलब्ध


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज रोजी 90 बेड उपलब्ध आहे. तसेच जिल्ह्यातील खाजगी हॉस्पीटल आयकॉन हॉस्पीटल येथे 24 बेड, ओझोन हॉस्पीटल येथे 28 बेड, बाबन हॉस्पीटल, मुर्तिजापूर येथे आवश्यकतेनुसार बेड, अवधाते हॉस्पीटल येथे 20 बेड, युनिक हॉस्पीटल येथे 18 बेड, अकोला ॲक्सीडेंट हॉस्पीटल येथे 16 बेड उपलब्ध आहेत. या खाजगी रुग्णालयात कोविड-19 चे उपचार करण्यात येतात, अशी माहिती जिल्हयाधिकारी यांनी दिली.

टिप्पण्या