Crime news:शिवसेना नगरसेवकाच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या; भावा कडूनच झाला घात। ShivSena corporator's son shot dead by step brother

शिवसेना नगरसेवकाच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या; भावा कडूनच झाला घात

Shiv Sena corporator's son shot dead by step brother


ठाणे: ठाण्यातील शिवसेनेचे नगरसेवक माणिक पाटील यांच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या करुन मृतदेह वाशीच्या खाडीत टाकण्यात आला असल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. 



दरम्यान माणिक पाटील यांच्या घरातील साडेतीन किलो सोन्याचे दागिने देखील चोरीला गेले असल्याची माहिती कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी  प्रसार माध्यमांना दिली. ही हत्या माणिक पाटील यांच्या सावत्र मुलगा सचिन पाटील याने संपत्तीच्या वादातून केली असल्याचा संशय वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी व्यक्त केला आहे. हा प्रकार माणिक पाटील यांच्या वाहन चालकाला ताब्यात घेतल्यानंतर उघडकीस आला असून मुख्य संशयित आरोपी सचिन पाटील फरार असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. तसेच मृतदेह शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.



राकेश माणिक पाटील (३४) असे हत्या करण्यात आलेल्या नगरसेवक पुत्राचे नाव आहे. शिवसेनेचे नगरसेवक माणिक पाटील हे ठाण्यातील घोडबंदर रोड येथे राहण्यास आहे. राकेश हा जवळच असणाऱ्या शिवसृष्टी इमारत येथे राहण्यास होता. २० सप्टेंबर रोजी रात्रीपासून बेपत्ता असणाऱ्या राकेश पाटील यांचा मोबाईल फोन बंद लागत असल्यामुळे माणिक पाटील यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती.



राकेशचा शोध सुरू असताना माणिक पाटील यांच्या बंगल्यातील साडेतीन किलो सोन्याचे दागिने गायब असल्याचे माणिक पाटील यांच्या लक्षात आले. नगरसेवक पाटील यांनी याप्रकरणी पोलिसांना कळवले. मुलगा आणि सोनं गायब झाल्यामुळे कासारवडवली पोलिसांनी हे प्रकरण गंभीरतेने घेऊन कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी राकेशच्या शोधासाठी पोलिसांचे एक विशेष पथक तयार केले.



राकेशचा शोध सुरू असताना त्याची मोटारसायकल माणिक पाटील यांचा वाहन चालक गौरव सिंह यांच्याकडे पोलिसांना सापडली. पोलिसांनी संशयावरून गौरव सिंह याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी करताच त्याने राकेशची हत्या करून मृतदेह वाशीच्या खाडीत फेकला असल्याची कबुली दिली. 



सचिन पाटील हा राकेशचा सावत्र भाऊ असून त्याने बंगल्याच्या वाटणीवरून राकेशची गोळ्या झाडून हत्या केली, त्यानंतर आम्ही दोघांनी मिळून मृतदेह वाशीच्या खाडीत फेकला असल्याची कबुली गौरव सिंह याने पोलिसांकडे दिली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी आपलं महानगरशी बोलतांना सांगितले.



काय घडले त्या दिवशी?

राकेश आणि सचिन या सावत्र भावांमध्ये माणिक पाटील यांच्या बंगल्याच्या वाटणीवरून वाद सुरू होता. २० सप्टेंबर रोजी रात्री सचिनने राकेशला विजय गार्डन येथील बंगल्यावर बोलावून घेतले होते. त्या ठिकाणी गौरव सिंह हा देखील हजर होता. या तीघांशिवाय बंगल्यावर इतर कोणीही नव्हते. तिघे एकत्र  आल्यानंतर रात्रभर दारू प्यायले त्यादरम्यान सचिन आणि राकेश यांच्यात बंगल्याच्या वाटणीवरून वाद देखील झाला. दुसऱ्या दिवशी पहाटे सचिन हा झोपेतून जागा झाला आणि स्वतःजवळील पिस्तूलामधून झोपेत असणाऱ्या राकेशवर गोळ्या झाडून ठार केले. त्यानंतर सचिन आणि गौरव सिंह यांनी राकेशचा मृतदेह गोणीत भरून वाशीपुलावरून खाडीत फेकून दिला, अशी कबुली गौरवने पोलिसांना दिली.


या प्रकरणी कासारवडवली पोलिसांनी हत्या, पुरावा नष्ट करणे आणि हत्यारबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून गौरव सिंह याला अटक केली असून फरार झालेल्या सचिन पाटील याचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक खैरनार यांनी दिली. तसेच सोन्याच्या दागिन्यांबाबत गौरवला काही माहीत नसून हे दागिने नगरसेवक यांचा सावत्र मुलगा सचिन पाटील याने चोरी केले असावे, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. 



राकेशचा मृतदेह अद्याप मिळून आलेला नसून वाशीच्या खाडीत मृतदेहाचा शोध घेण्यासाठी स्थानिक मच्छिमार यांची मदत घेण्यात येत असून मृतदेह शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचे खैरनार यांनी सांगितले.

टिप्पण्या