Bachhu kadu:कट्यार गावाचा विकास आराखडा आठ दिवसात तयार करा-बच्चू कडू

कट्यार गावाचा विकास आराखडा आठ दिवसात तयार करा-बच्चू कडू

महिला शेतकरी ज्योतीताई देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट



अकोला,दि.४: कट्यार गावाचा  विकास आराखडा आठ दिवसात तयार करा. तसेच शेतीवर आधारित पिकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेती विकासावर अधिक भर देण्याचे नियोजन करा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी प्रशासनाला  दिले.



आज कट्यार गावातील महिला शेतकरी ज्योतीताई देशमुख यांच्या निवासस्थानी श्री. कडू यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांना साडीचोळी देवून त्यांची विचारपूस केली. तसेच गावातील समस्या व अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी तहसिलदार विजय लोखंडे, जिल्हा परिषदचे सदस्य गोपाल दातकर, कट्यार गावाचे सरपंच देविदास भारसाकडे, माजी सरपंच गोपाल ठाकरे, उपसरपंच रमेश नांदुरकर, मंडळ अधिकारी नितीन शिंदे, तलाठी माणिक तायडे, ग्रामसेवक राजीव गरकल, पोलिस पाटील बालकृष्ण बांभुळकर, शाळा समितीचे अध्यक्ष सुभाष कडू व  ग्रामस्थ उपस्थित होते.



गावातील समस्या जाणून घेतानी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी शेताच्या बांधावर व शेतात फळबाग लावण्याकरिता शासनाच्या योजनेचा आढावा घेवून या योजनेचा माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करा. यासाठी बहूपिक पध्दतीचा वापर करा. तसेच पोखरा योजनेचा लाभ अधिकाअधीक शेतकऱ्यांना मिळवून देण्याचेही निर्देश श्री.  कडू यांनी यावेळी  दिल्यात.




शेतामध्ये पाणी जमा होवू नये यासाठी शेतीचे सपाटीकरण करुण घ्या. येथील शेती ही बहुतांश कोरडवाहू असून ते खारपाण पट्ट्यातील आहे. त्यामुळे शेतात शेततळे व कालव्यावर खोदतळे तयार करण्यासाठी व शेतीला प्राधान्य देवून शेतीचे सर्वागीण विकासाकरीता प्रस्ताव तयार करावा. याकरीता द्रोणव्दारे गावांचे सर्वेक्षण करण्याचेही सूचना श्री. बच्चू कडू यांनी दिल्या.



गावामध्ये असलेले बचत गट एकत्रीत येवून गावाचा विकास कसा करता येईल. तसेच बचत गटाच्या माध्यमातून शेतीसोबतच गवती चहा, बांबू लागवड व इत्तर पूरक व्यवसाय करा. यासाठी महिला शेतकरी ज्योतीताई देशमुख यांनी पुढाकार घ्यावा. शासनामार्फत त्याना आवश्यक ती मदत केल्या जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिलेत.  कडू यांनी गावकऱ्यांना विकासासाठी एकत्र येवून मदत करण्याचेही आवाहन केले.

टिप्पण्या