National highway:राष्ट्रीय महामार्गाचे जलदगतीने रूंदीकरण करा

राष्ट्रीय महामार्गाचे जलदगतीने रूंदीकरण करा


*अपघातांच्या पार्श्वभूमीवर झुंज सामाजिक संघटना आक्रमक

*जडवाहनांना दिवसभर बंदी करण्याचीही मागणी


अकोला: अकोला शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या रूंदीकरणाचे काम गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे रस्त्यावर मातीचे ढीग, खड्डे तयार होवून हा महामार्ग वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गाचे लवकरात लवकर रूंदीकरण करावे या मागणीसाठी झुंज सामाजिक संघटना आक्रमक झाली असून, दिवसभर या महामार्गावर जडवाहनांना बंदी करण्यात यावी, अशी मागणीही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.  


अकोला शहरातून मुंबई कलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा जातो. या मार्गावर विमानतळ, औद्योगिक वसाहत, कृषी विद्यापीठ आहे. यामुळे सदर मार्गावर चोवीस तास वाहनांची वर्दळ असते. या राष्ट्रीय महामार्गाला लागूनच अनेक गावेही वसलेली आहेत. तयामुळे ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग कामाकरिता नियमित शहराकडे येणे जाणे करतात. तसेच शहरातील अनेक व्यक्ती, व्यापारी वर्ग अकोला ते बोरगाव तसेच मूर्तिजापूरकडे येणे जाणे करीत असतात. विशेष म्हणजे या महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम गेल्या तीन वर्षांपासून बंद असल्याने रस्त्यावर जागोजागी मातीचे ढीग आणि खड्डे निर्माण होवून ते अपघाताला आमंत्रण देत आहेत. या रस्त्याचे मागील पंचवार्षिकमध्ये अर्धवट स्वरूपाचे काम झाले असून, हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या ठिकाणी अनेक लहानमोठे अपघात होवून अनेकांना जीवाला मुवे लागले आहे. 

७ ऑगस्ट रोजी अशाचप्रकारे दुचाकीस्वार महिला बँक कर्मचारी विमानतळ परिसरात अपघातात ठार झाली. त्यामुळे या महामार्गाचे लवकरात लवकर रूंदीकरण करण्यात यावे, अपूर्ण काम त्वरित पूर्ण करण्याचा आदेश काढावा, विशेष बाब म्हणून दुचाकी वाहनधारकांसाठी कृषी विद्यापीठ ते विमानतळापर्यंत साईड रोड काढावा किंवा राज्याच्या बजेटमधून कृषी विद्यापीठ ते विमानतळापर्यंत साईड रोड काढावा, सकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत या रस्त्यावर जडवाहनांना बंदी करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या माध्यमातून केंद्रीय भूपृष्ठ रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, अकोल्याचे केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, अकोलाचे पालकमंत्री बच्चू कडू यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. 

झुंज सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत भारसाकळ, जिल्हाध्यक्ष सुहास साबे तसेच संदीप पाटील महल्ले यांच्या मार्गदर्शनात तसेच जिल्हा उपाध्यक्ष सचिन बचे यांच्या नेतृत्वात निवेदन देताना शुभम पीठलोड, गोविंद पांडे, सागर पाटील, बाळू ढोले पाटील, सोनू गवई, संतोष कात्रे, गणेश बोदडे, अजय ठाकूर, चंदू अग्रवाल, अपुल राठोड, शैलेश ढोले, आशिष गवळी यांची उपस्थिती होती.

टिप्पण्या