Monsoon Picnic:पावसाळी सहलीला जाणाऱ्या पर्यटकांना धरण व सिंचन प्रकल्पावर प्रवेशास बंदी

पावसाळी सहलीला जाणाऱ्या पर्यटकांना धरण व सिंचन प्रकल्पावर प्रवेशास बंदी



गणेश विसर्जन, देवी विसर्जन व पर्यटनासाठी निर्बंध



अकोला: श्रावणातील रिमझिम पावसात निसर्गाच्या सानिध्यात रमण्यसाठी सहल आयोजित केल्या जातात.सध्या lockdown सुरू असले तरी,युवावर्ग शहराच्या जवळपास असलेल्या पर्यटनाच्या ठिकाणी जात आहेत. तर काही जण कुटुंबासह ओव्हरफ्लो होत असलेली धरण पाहण्यासाठी जातात. मात्र,धोक्याची पातळी बघता पर्यटकांनी धरण वा सिंचन प्रकल्प येथे जावू नये,असे निर्देश  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.


पावसाळा सुरु झाला की वातावरणात  गारवा निर्माण होतो. चिंब पावसात भिजण्याची आणि आनंद लुटण्याची अबाल वृद्धांची तयारी असते. कोणाचे ट्रेकला जाण्याचे तर कोणी  एका दिवसाच्या सहलीला जाण्याचे बेत आखतात. मग कोणी पातूर घाट तर कोणी  नरनाळा, पोपट खेड,  सुर्या धबधबा, शहानुर, महान,काटेपूर्णा अशा अनेक ठिकाणी जावून पावसात भिजण्याचा आनंद पूर्ण करतात.यंदा कोरोना विषाणूच्या सावटाखाली पर्यटकांची संख्या तुरळक आहे.मात्र, या पर्यटकांनी सहलीला जाताना काळजी घेण्याची गरज आहे.कारण जिल्ह्यातील नदी,नाले,धरण तुडुंब भरली आहे.



जिल्ह्यात आजपर्यत सरासरी ६३५.१० मि.मी. पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघू प्रकल्पामध्ये मोठया प्रमाणात पाणीसाठा जमा झाला आहे. पोपटखेड, घुंगसी व शहानूर या प्रकल्पाच्या ठिकाणी गणेश विसर्जन, देवी विसर्जन तसेच या प्रकल्प क्षेत्रामध्ये मोठया प्रमाणात पर्यटनासाठी येतात. यापुर्वी अशा प्रकल्पामध्ये बुडून मृत्यू झाल्याच्या घटना झाल्या आहे. त्याअनुषंगाने आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टिने या प्रकल्पाच्या ठिकाणी पर्यटकांना प्रवेशास बंदी करण्यात आली असल्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहे.



जिल्ह्यात दोन मोठे, पाच मध्यम व ३३ लघू पाटबंधारे प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये सध्या मोठ्याप्रमाणात जलसाठा आहे. पुढील काळात जलसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा प्रकल्पामध्ये गणेश विसर्जन, देवी विसर्जन व पर्यटनासाठी निर्बंध  घालण्यात आले आहे. 


टिप्पण्या