Journalist: दिवंगत पत्रकार संतोष भोसले यांच्या कुटुंबियांना पत्रकार संघाच्या वतीने आर्थिक मदत

दिवंगत पत्रकार संतोष भोसले यांच्या कुटुंबियांना पत्रकार संघाच्या वतीने आर्थिक मदत

संकट समयी राज्य मराठी पत्रकार संघ पत्रकारांच्या पाठीशी-वसंत मुंडे



गेवराई/बीड: कोरोना कक्षात उपचार सुरू असताना पत्रकार संतोष भोसले यांचे निधन झाले. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी दिवंगत पत्रकार भोसले यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन पत्रकार संघाच्या वतीने पंधरा हजार रुपयांचा धनादेश देऊन मानसिक आधार दिला. तर करोना काळात मृत्यू पावल्यानंतर सरकारने घोषणा केल्याप्रमाणे त्यांच्या कुटुबियांना पन्नास लाख रुपयांच्या विमा कवच अंतर्गत मदत करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली असुन याबाबतचा पाठपुरावा सुरू असल्याचेही मुंडे यांनी सांगितले. 



पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे आणि सरचिटणीस विश्‍वास आरोटे यांच्या पुढाकारातून राज्यात अडचणीच्या काळात पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची भूमिका सातत्याने घेतली जाते. 




बीड जिल्ह्यातील गेवराई येथील दैनिक सामना वृत्तपत्रात सलग 28 वर्ष कार्यरत असलेले तरुण पत्रकार संतोष भोसले यांना करोना संशयित म्हणुन जिल्हा रुग्णालयातील कोव्हिड कक्षात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच 28 जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला. घरातील कर्ता पुरुष अचानक गेल्यामुळे पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा या कुटुंबावर मोठा आघात झाला. 



दिवंगत पत्रकाराच्या कुटुंबियांची शनिवार दि. 29 ऑगस्ट रोजी भेट घेऊन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी सांत्वन केले. राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पंधरा हजार रुपयांचा मदतीचा धनादेश देऊन कुटुंबियांना मानसिक आधार दिला.



यावेळी ज्येष्ठ पत्रकार संतोष मानूरकर, मराठवाडा विभागीय संघटक तथा बीड जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अंकुश आतकरे, मधुकर तौर, सुभाष सुतार उपस्थित होते. 




दिवंगत संतोष भोसले हे धडाडीचे आणि निर्भिड पत्रकार म्हणुन जिल्हाभर ओळखले जात होते. त्यांचा मित्र परिवार मोठा असल्याने मामा या टोपण नावाने ते प्रसिद्ध होते. सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, राजकीय या क्षेत्रात त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. निर्भिडपणे पत्रकारीता करताना अचानकपणे त्यांना करोना संशयित म्हणुन रुग्णालयात दाखल केले आणि मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा या परिवारावर संकट कोसळले. 



राज्य पत्रकार संघाचे संस्थापक संजय भोकरे, सरचिटणीस विश्‍वास आरोटे यांच्या पुढाकारातून राज्यभरात मयत पत्रकारांच्या कुटुंबियांना मदत दिली जाते. करोना काळात कर्तव्यावर असताना पत्रकाराचा मृत्यू झाला तर पन्नास लाख रुपयांच्या विमा कवच अंतर्गत विमा कवच देण्याची घोषणा सरकारने केली होती. त्या अनुषंगाने मयत संतोष भोसले यांच्या कुटुंबियांना मदत करावी यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठपुरावा चालू असुन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही पत्र देऊन पाठपुरावा केला असल्याची माहिती मुंडे यांनी दिली. 



यावेळी ज्येष्ठ पत्रकार शिवाजी ढाकणे, सुनिल पोकळे, मराठी पत्रकार संघाचे शहराध्यक्ष प्रदीप जोशी, सचिव तुळशीराम वाघमारे, उपाध्यक्ष भागवत देशपांडे, अमोल वैद्य, रामहरी काकडे, अमोल कापसे, सखाराम शिंदे, कैलास टकले, भागवत जाधव, जुनेद बागवान, प्रसाद कुलकर्णी आदि उपस्थित होते.

भोसले कुटुंबियांना पहिला मदतीचा हात 
दिवंगत पत्रकार संतोष भोसले यांच्या निधनास महिना झाला. पत्रकार संतोष भोसलेंच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा आहे. एक मुलगी आणि मुलगा शिक्षण घेत आहेत. त्यांच्या पुढील शिक्षणाचा आणि उदरनिर्वाहाचा प्रश्‍न घरातील कर्ता पुरुष अचानक गेल्याने निर्माण झाला आहे. भविष्यातील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने भोसले हे पत्रकार संघाचे सभासद नसताना सुध्दा आर्थिक मदतीचा पहिला हात दिला. राजकीय नेतृत्वासह दानशुरांनी पुढे येऊन भोसले कुटुंबियांना आर्थिक हातभार देणे गरजेचे आहे.

टिप्पण्या