For Reliance:रिलायन्सच्या २४ कोटींसाठी कर्मचारी संघटना सरसावल्या... For Reliance's Rs 24 crore Employees' unions moved ...

रिलायन्सच्या २४ कोटींसाठी
कर्मचारी संघटना सरसावल्या...



अकोला, दि. २९: अकोला महानगर पालिकेने रिलायन्सच्या कंपनी कडून चोवीस कोटी रुपयांची रक्कम वसूल केल्यानंतर आपल्या विविध मागण्याची पूर्तता करण्यासाठी कर्मचारी संघटना सरसावल्या असल्याचे चित्र आज दिसून आले आहे. 



आज मनपा आवारात विविध कर्मचारी संघटनांची तातडीची  संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत ज्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या त्यामध्ये सर्वप्रथम ही रक्कम वसूल करण्यासाठी प्रयत्न करणारे केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा,आ रणधीर सावरकर, माजी महापौर विजय अग्रवाल,महापौर अर्चना मसने,उपमहापौर राजेंद्र गिरी,स्थायी समिती सभापती सतीश ढगे, आयुक्त संजय कापडणीस , बांधकाम अभियंता अजय गुजर यांच्या अभिनंदनाचा ठराव पास करण्यात आला. 



तर ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या हितासाठी खर्च करण्यात यावी , यासाठी पुढील मागण्या मान्य करण्यासाठी सोमवारी पत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


काय आहेत मागण्या

यामध्ये सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम त्वरित अदा करण्यात यावी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना रजा रोखे, आंशिकरण थकीत रक्कम देण्यात यावी,अनुकंपा तत्वावरील कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यात यावे,पदोन्नती व कालबध्द पदोन्नतीची प्रक्रिया तात्काळ सुरू करून अमलबजावणी करण्यात यावी तसेच कर, जलप्रदाय व इतर विभागातील बेकायदेशीर रोखण्यात आलेली वेतनवाढ तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात येणार आहे.


कृती समितीचे पी. बी. भातकुले  यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला अकोला म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष विठ्ठलराव देवकते, कार्याध्यक्ष धनंजय मिश्रा, विजय पारतवार, संजय काथले, सफाई मजदूर काँग्रेसचे, अनुप खरारे, विजय सारवान, कास्तराईब संघटनेचे उमेश सटवाले, दिलावर खान, लक्ष्मण गाढवे, भारतीय मजदूर संघाचे प्रकाश घोगलीया, उमेश लखन,भारतीय कामगार सेनेचे दीपक दाणे, कैलाश गाढवे, निलेश सिरसाट, सेवानिवृत्त संघटनेचे जी आर खान, आनंद अवसाळकर, ओम ताडम व सर्व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या