Emrald school:एमराल्ड स्कूलने केली लाखोंची फसवणूक; अध्यक्ष, संचालक, मुख्यध्यापक यांच्या विरोधात गुन्हे दाखल

एमराल्ड स्कूलने केली लाखोंची फसवणूक; अध्यक्ष, संचालक, मुख्यध्यापक यांच्या विरोधात गुन्हे दाखल


एमरॉल्ड शाळेच्या प्रकरणी पालकांनी या संदर्भात शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारीची तत्काळ दखल घेत बच्चू कडू यांनी सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत शिक्षणाधिकारी यांना चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. व संबंधित व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.



अकोला: केशवनगर परिसरातील एमरॉल्ड हाइट्स स्कूलने सीबीएससीच्या नावाखाली पालकांची लाखो रुपयाने बोळवण करून फसवणूक केली. याप्रकरणी शाळेचे अध्यक्ष, संचालक मंडळ व मुख्यध्यापक यांच्या विरोधात खदान पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


खदान पोलिस स्टेशनला पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्याम विठ्ठलराव राऊत  यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शहरातील केशव नगर रिंग रोड परिसरातील एमरॉल्ड हाइट्स स्कूलमध्ये इयत्ता पहिली व दुसरीसाठी ऑनलाईन वर्ग न घेण्याचे आदेश असतानासुद्धा ऑनलाइन वर्ग घेणे, शैक्षणिक संस्था शुल्क अधिनियम २०११ नुसार पालक-शिक्षक संघ व पालक शिक्षक संघ कार्यकारी समिती गठीत न करणे, शाळेला स्टेट बोर्डाची मान्यता असताना सीबीएससी अभ्यासक्रमाची पुस्तके विक्री करणे, सीबीएससीच्या नावाखाली पालकांकडून अवाजवी शैक्षणिक शुल्क वसूल करणे, शाळेमधुनच वह्या, पुस्तके, गणवेश व शैक्षणीक साहित्य विक्री करणे, शाळेला स्टेट बोर्डचा अभ्यास न शिकविता सीबीएससी अभ्यासक्रम शिकविणे, तसेच सीबीएससीच्या नावाखाली पालकांकडून बेकायदेशीर रक्कम वसूल करण्यात आली असून पालकांची व विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यात आली आहे. याप्रकरणी गंभीर स्वरूपाची माहिती चौकशीत उघड झाले आहे. याप्रकरणी प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी खदान पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार दिली होती. यामध्ये स्कूलचे संचालक मंडळ, शाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापिका दोषी आढळून आल्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा गुप्ता, अध्यक्ष संजय तुलशान, अल्फा तुलशान आदींसह संचालक मंडळाविरोधात भादवि कलम ४२०, ३४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.


सीबीएससीच्या नावाखाली पालकांची दिशाभूल करून एमरॉल्ड हाइट्स स्कूलने पालकांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. शाळेचे संचालक, मुख्याध्यापक व संचालक मंडळ पालकांना सातत्याने भीती दाखवून मनमानी कारभार करत असून सिबीएससीच्या नावावर वेगवेगळ्या माध्यमातून पैसे उकळत आहे. शिक्षण हा केवळ धंदा असल्याचे शाळेचे संचालक राजरोसपणे सांगत असून आमचे कोणीच बिघडू शकत नाही असेच पालकांना सुद्धा धमकावत असल्याचे अनेक तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. 


एमरॉल्ड हाईट्स स्कूलने शाळेमध्ये शैक्षणिक साहित्याची विक्री राजरोसपणे सुरू आहे. शालेय गणवेश, वह्या, पुस्तके, शूज आदींसह सर्व शैक्षणिक साहित्य विक्रीचे दुकान शाळेतच थाटले आहे. बाहेर मिळणाऱ्या वस्तू तब्बल दुप्पट किमतीमध्ये विकण्याचे प्रकार शाळेच्या माध्यमातून होत असल्याचे उघड झाले.


एमराल्ड हाइट्स स्कूलची गीता नगर बायपास येथे मुख्य शाखा असून रिंगरोड कौलखेड व राऊतवाडी मुखर्जी बंगल्याजवळ येथे शाखा आहेत. कौलखेड शाखेने दिशाभूल करून लाखो रुपये उकळल्याने गुन्हे दाखल झाले असले तरी हाच प्रकार राऊतवाडी शाखेमध्ये सुद्धा सुरू आहे. राऊतवाडी शाखेची चौकशी किंवा होणार असा प्रश्न पालक वर्गाकडून विचारण्यात येत आहे.


एमरल्ड हाइट्स स्कूलच्या तिन्ही शाखेमध्ये विद्यार्थी व पालकांची दिशाभूल, मारहाण, महामानवांच्या प्रतिमेची विटंबना, विद्यार्थ्यांना मारहाण, पालकांशी अरेरावी  यासारखे कित्येक प्रकार सातत्याने होतात. यासंदर्भात पालकांनी संचालक मंडळ, अध्यक्षांकडे तक्रार केल्यास पालकांनाच खाली मान घालून यावे लागते. त्यानुषंगाने त्रस्त पालकांनी शाळेच्या विरोधात अनेक तक्रारी केल्या आहेत मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे पालकांचे म्हणणे आहे.



टिप्पण्या