Daryapur:चला हक्कासाठी लढू, न्यायासाठी एकत्र येऊ...

चला हक्कासाठी लढू, न्यायासाठी एकत्र येऊ... 


नकुल सोनटक्के यांची हाक : १४ ऑगस्टपासून येवद्यात अन्नत्याग आंदोलन



दर्यापूर, दि.१३ :  कोरोनाकाळात आमच्या तालुक्यातील अधिकारी कर्मचारी मुख्यालयी ठेवा. तहसीलदार साहेब, बीडिओ साहेब जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करा, अशी विनंती करूनही नोकरशाहीला पाठीशी घालणाऱ्या दर्यापूर तालुका प्रशासनाविरुद्ध येवदा येथील सामाजिक कार्यकर्ते नकुल सोनटक्के यांनी १४ ऑगस्टपासून अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.  

ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या येवद्याच्या गांधी चौकात त्यांच्या आंदोलनाला प्रारंभ होणार आहे. कोरोनाच्या काळात शेतकरी, कामगार, तरुण यांच्यावर उपासमारीची वेळ आली. रोजगार, उद्योगधंदे बुडाले. मात्र मस्तवाल नोकरशाहीला त्याचा फरक पडला नाही. शेतकरी हंगामाच्या काळात तलाठ्याकडून अक्षरशहा शेतकऱ्यांचा छळ झाल्याचे प्रकार पुढे आले. अनावश्यक दाखल्यांसाठी त्यांना तहसील कार्यालय गाठावे लागले. कंटेनमेंट झोनमधून अधिकारी सेफ झोनमध्ये येत आहेत. त्यामुळे गाव पातळीवर कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. ह्या सर्व बाबींची तहसिलदार गटविकास अधिकारी यांनी दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी येवद्याचे सामाजिक कार्यकर्ते नकुल सोनटक्के यांनी केली होती.

 तालुका प्रशासनाला त्यांनी आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर आपण आंदोलन छेडू असे पत्रही त्यांनी तहसीलदार योगेश देशमुख यांना दिले होते. मात्र मुजोर नोकरशाहीने त्याची कुठलीही दखल न घेतल्याने नकुल सोनटक्के यांनी १४ ऑगस्टपासून दर्यापूर तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याची बाब स्पष्ट केली होती. मात्र येवदा येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने आपण गावातच गांधी चौकात अन्नत्याग आंदोलन करू अशी त्यांनी भूमिका घेतली आहे. रुग्ण निघाल्यावर विलगीकरण यासाठी जो कालावधी दिला जातो तो कालावधीपूर्ण केल्यानंतर आंदोलनाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. आंदोलनादरम्यान कोरोना प्रतिबंधासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमावलीची आपण तंतोतंत पालन करू असेही सोनटक्के यांनी कळविले आहे.



यांचे मिळाले समर्थन
नकुल सोनटक्के यांच्या आंदोलनाला प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रदिप वडतकर, शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते विजय विल्हेकर, प्रहार वडनेर गंगाईचे शाखाप्रमुख आकाश घटाळे, पिंपळोदचे अमोल गुरव, भाजपा नेत्या किरण देशमुख, ज्येष्ठ शिवसैनिक बबन वांदे, आंबेडकरी संघटनेचे नेते प्रा.विनोद मेश्राम, छावा संघटनेचे पंकज कन्हेरकर, सूरज कैकडी, संकल्प प्रतिष्ठानचे अभिजीत  गोंडकर, दर्यापुरचे ज्येष्ठ विधीतज्ञ संतोष कोल्हे यांच्यासह असंख्य सामाजिक राजकीय संघटनांचे पाठबळ या आंदोलनाला मिळाले आहे.

टिप्पण्या