corona virus news:कोरोना संकट काळात शहरी व ग्रामीण जनतेने सहकार्य करावे - डॉ. सुरेश आसोले

कोरोना संकट काळात शहरी व ग्रामीण
जनतेने सहकार्य करावे - डॉ. सुरेश आसोले  



अकोला: ग्रामीण व शहरी भागांमध्ये कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आरटीपीसीआर नमुने घेण्यासाठी शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामध्ये नमुन्यांची तपासणी करण्यात येत आहे. याकरिता सदर शिबिराची प्रत्यक्ष पाहणी व मार्गदर्शन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले हे स्वत: करीत आहेत. तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात आरोग्य शिक्षण देण्यात येत असून, व्याळा, चतारी, झोडगा या ठिकाणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. 



यावेळी व्याळा या गावामध्ये कमी प्रतिसाद मिळत असल्याचे लक्षात येताच स्वत: जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी घरोघरी जावून तपासणी करण्याचे ज्येष्ठ नागरिकांना आवाहन केले. सर्दी, ताप, खोकला यासारखी लक्षणे आढळल्यास जनतेने स्वत:हून आपली तपासणी करून घ्यावी, त्याचप्रमाणे शेतावर एकत्रित काम करीत असताना किंवा एकत्रित जेवण करताना सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन करावे जेणेकरून या आजाराचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. याकरिता स्थानिक पदाधिकारी यांच्याशीही संवाद साधण्यात येत आहे.




शुक्रवार २८ ऑगस्टपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात ग्रामीण व नागरी भागात १२०५० आरटीपीसीआर नमुने घेण्यात आले. यामध्ये ७१३ नमुने पॉझिटिव्ह आले तर १११०७ निगेटिव्ह आले. यामध्ये २३० नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. तसेच रॅपीट अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये एकूण ९१६५ नमुने घेण्यात आले. यामध्ये ४०५ पॉझिटिव्ह आणि ८७६० नमुने निगेटिव्ह याप्रमाणे अहवाल प्राप्त झाले आहेत. तरी ग्रामीण व शहरी जनतेने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमित मास्कचा वापर करावा, गर्दीत जाणे टाळावे, सोशल डिस्टनींगच्या नियमांचे पालन करावे, कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभाताई भोजने, उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती सावित्रीबाई राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटारिया व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी केले आहे, असे जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी प्रकाश गवळी यांनी कळविले आहे.      

टिप्पण्या