police recruitment:मेगा पोलीस भरतीची घोषणा; राज्यात १२ हजार ५३८ पदे भरणार Announcement of mega police recruitment; 12 thousand 538 posts will be filled in the state

मेगा पोलीस भरतीची घोषणा; राज्यात १२ हजार ५३८ पदे भरणार

2018 भरती मधील प्रतिक्षा यादीतील उमेदवारांचे काय होणार,या निम्मित प्रश्न उपस्थित


नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: अडीच वर्षांपासून राज्यात पोलीस भरती झालेली नाही. 2018 मध्ये प्रतिक्षा यादीत असलेल्या युवकांनाच पोलीस भरतीची प्रतिक्षा असतांना, आज शुक्रवार १७ जुुलै रोजी गृह राज्यमंत्री अनिल देशमुख यांनी मेगा पोलीस भरतीची घोषणा केली. राज्यात पोलीस दलात दोन-चार हजार नव्हे तर १२ हजार ५३८ पदे भरण्यात येणार आहेत. डिसेंबरपर्यंत ही पदे भरण्यात यावीत, असे आदेशच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृह विभागाला दिले आहेत. त्यामुळे राज्यात येत्या काही दिवसांत पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होईल. मात्र,2018 प्रतिक्षा यादीतील आणि 2019 मधील अर्ज करणारे पोलीस भरतीत इच्छुक असलेल्या उमेदवारांचे काय,याबाबत गृहमंत्री यांनी या आदेशात काही स्पष्ट केलेले नाही.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज शुक्रवारी गृहविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात महत्त्वाची बैठक घेतली.  बैठकीत पोलीस दलातील १२ हजार ५३८ विविध पदे तातडीने भरण्याचे आदेश देशमुख यांनी दिले. डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही देशमुख यांनी दिले आहे.बैठकीला गृहविभागाचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, अर्थ विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. स्वत: देशमुख यांनी  याबाबत समाज माध्यमातून माहिती दिली आहे. सुमारे तासभर ही बैठक चालली. या बैठकीत कोणती कोणती पदे आणि कोणत्या कोणत्या विभागात रिक्त आहेत, याचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर ही भरती प्रक्रिया सुरू केल्यानंतर कधी पर्यंत पूर्ण होईल, याचाही आढावा घेण्यात आला. त्यानंतर देशमुख यांनी पोलीस भरतीचे आदेश दिले.

राज्यात पोलिसांची संख्या खूपच कमी आहे. अशा परिस्थितीत करोनामुळे पोलिसांवर कामाचा अधिक ताण आला आहे. दरम्यानच्या काळात अनेक पोलिसांना करोनाची लागण झाली. यामध्ये काही पोलिसांना प्राण गमवावे लागले आहेत.त्यामुळे पोलीस भरती करण्यात येत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. 

एकीकडे अशी स्थिती असतांना, महाराष्ट्र पोलीस भरती 2018 मधील प्रतिक्षा यादीतील आणि कागदपत्रे पडताळणी झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश न देता नवीन भरती आदेश गृहमंत्री यांनी काढले आहेत.तसेच 2019 मधील भरती साठी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांचे पुढे काय?,त्यांच्या अर्जाचे काय झाले,असे अनेक प्रश्न 2018 आणि 2019 मध्ये पोलीस भरतीत इच्छुक असलेले उमेदवार विचारत आहेत.काहींनी तर अनिल देशमुख यांच्या ट्वीटला रिप्लाय करून प्रश्नांची सरबती सुरू केली. या उमदे वारांच्या प्रश्नांची उत्तरे समाधानकारक गृहमंत्री यांच्याकडून मिळतील का,की अजून नवा आदेश यासंदर्भात काढतील,हे येत्या काही दिवसात कळेलच,अशी अपेक्षा प्रतीक्षा यादीत असलेल्या उमेदवारांना आहे.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 7 जुलै रोजी घेतला होता निर्णय 

राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलीस शिपाई संवर्गात दहा हजार तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याचा फायदा शहरी व ग्रामीण तरुणांना होईल, त्यांना पोलीस दलात सेवेची संधी मिळेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 7 जुलै रोजी दिली होती. नागपूरमधील काटोल येथे राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला बटालियनची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात ही महत्त्वाची बैठक झाली होती. बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, महसुल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. श्रीनिवास, एसआरपीएफच्या अपर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत गृह विभागाकडून पोलीस शिपाई पदाच्या 8 हजार जागा भरण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यात आणखी 2 हजार जागा वाढवून एकूण 10 हजार पोलीस शिपाई भरती करण्याचे व ही भरतीप्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. कोरोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर ही भरतीप्रक्रिया विनाअडथळा यशस्वीपणे कशी राबवता येईल, याचा विचार करुन सर्वंकष प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत तातडीने मांडण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले होते. मंत्रिमंडळ मंजुरीनंतर भरतीप्रक्रियेची कार्यवाही वेग घेईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला होता.

राज्यात 10 हजार पोलीस शिपायांची भरती करण्याबरोबरच नागपूरच्या काटोल येथे राज्य राखीव पोलीस दलाची महिला बटालियन स्थापन करण्याच्या निर्णयावरही  उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले होते. या बटालियनसाठी 1384 पदे निर्माण करण्यात येणार असून प्रत्येक टप्प्यात 461 प्रमाणे 3 टप्प्यात ही पदे भरण्यात येणार आहेत. यातूनही शहरी व ग्रामीण युवतींना पोलीस सेवेची संधी मिळणार असल्याचेही उपमुख्यमंत्री म्हणाले होते.

राज्यातील सण, उत्सव, सामाजिक-राजकीय मोर्चांमध्ये महिलांची लक्षणीय संख्या लक्षात घेऊन कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी ही बटालियन स्थापन करण्यात येणार आहे. उपराजधानी नागपूरची भौगोलिक स्थिती, रेल्वे, विमान व दळणवळणाच्या साधनांची उपलब्धता लक्षात घेवून एसआरपीएफच्या या केंद्रासाठी नागपूर जिल्ह्याची शिफारस करण्यात आली होती. त्याअनुषंगाने काटोल गावच्या हद्दीत शासकीय जमिन उपलब्ध असल्याने त्याठिकाणी ही बटालियन स्थापन करण्यात येणार आहे. या निर्णयांमुळे राज्यातील युवक, युवतींना पोलीस सेवेत दाखल होण्याची संधी मिळेलंच, त्याचबरोबर पोलिसांवरील ताण कमी होण्यास, कायदा-सुव्यवस्था अधिक भक्कम होण्यास मदत होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला होता.

......




टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा