Navi Talaee:आणि नवी तलाईचा दूर झाला अंधार...

आणि नवी तलाईचा दूर झाला अंधार...

प्रकाशवाट निर्माण करणारे अजितपर्व-आमदार अमोल मिटकरी

अकोला: निसर्गाच्या सानिध्यात सातपुड्याच्या पायथ्याशी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातुन पुनर्वसित आदिवासी झालेले तेल्हारा तालुक्यातील ५४० लोकवस्तीचे गाव म्हणजे नवी तलई. गावाला महसूली दर्जा नाही, मूलभूत सुविधा  नाही, रस्ते, पाणी, आरोग्य शिक्षणासह गावातील सर्वात मोठी समस्यां म्हणजे २१ व्या शतकातही गावामध्ये वीज पोहचलेली नव्हती. माजी जि.प सदस्य गोपाल कोल्हे यांनी याबाबत पाठपुरावा केला.आमदार अमोल मिटकरी यांनी गावाला भेट देऊन समस्यां जाणून घेतल्या व गावाच्या विकासाचा ध्यास घेऊन शासन स्तरावर यशस्वी प्रयत्न केल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाला संपूर्ण गाव प्रकाशमान झाले.आणि गावाला अनोखी भेट मिळाली गावात दिवाळी साजरी झाली.नवी तलाईची वाटचाल तिमिराकडून तेजाकडे झाली.

यावेळी विविध गावातील सरपंचांना सॅनीटायजर मशीन, गावकऱ्यांना इलेक्ट्रीक लाईट,मास्क,सॅनीटायझरचे वाटप करण्यात आले.महिलांना साडीचोळीची भेट देण्यात आली.

अनेक वर्षानंतर गावात पहिल्यांदाच लाईट आल्याने गावकऱ्यांच्या चेहर्‍यावरील आनंद ओसंडून वाहत होता तर लहान मुलांसोबत ६१ दिवे लावून केक कापत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा साजरा करण्यात आलेला वाढदिवस गावकऱ्यांच्या कायम स्मरणात राहणारा ठरला. गावात पहिल्यांदाच लाईट आल्याने लहान मुले रस्त्यावर आनंदाने खेळताना दिसली.


नवी तलाई गावातील नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागत होती आजूबाजूच्या गावात आपला मोबाईल चार्ज करुन जगाच्या संपर्कात राहण्याच्या प्रयत्न करीत होते. आज सर्वत्र ऑनलाईन शाळेची चर्चा आहे, मात्र, गावात लाईनच नाही तर ऑनलाईन शाळा घरात कशी भरणार? असा प्रश्न पडला असताना ही बाब विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी यांना कळताच त्यांनी या गावाचा चेहरा मोहरा बदलण्याच्या ध्यास घेतला.आणि गाव दत्तक घेण्याची अधिकृत घोषणाही केली त्यामुळे गावकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून अंधारलेल्या आयुष्यात प्रकाश निर्माण करण्याचा ध्यास यशस्वी झाला आहे.

महावितरण कर्मचाऱ्यांनी मिशन मोडवर काम करीत प्रत्येक घराला प्रकाशमान करण्याचे कार्य केले. यासाठी अधीक्षक अभियंता पवन कछोट,उपविभागीय अभियंता उईके,अभियंता  कोहाड,हिवरखेड विभागाचे ए.ए.कुमार यांचे प्रयत्न महत्त्वाचे ठरले.

दुर्लक्षित असलेलं पुनर्वसित तलाई गावाला आमदार अमोल मिटकरी यांनी भेट दिल्याने गाव पुन्हा चर्चेत आले.त्यांनी ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेत मूलभूत सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिल्याने निराश्रित आयुष्य जगणाऱ्या नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.

कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने कुठलाही कार्यक्रम न करता शासनाचे सर्व नियमांचे पालन करून आमदार मिटकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या 'अजितपर्व' सोहळ्यात गावासाठी पाठपुरावा करणारे माजी जि प सदस्य गोपाल कोल्हे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शंकरराव चौधरी,नानासाहेब हिंगणकर,तेल्हारा राष्ट्रवादीचे प्रदीप ढोले,राजू खान,जमिल खान,अकोट तालुक्याचे कैलास गोंडचवर,प.स समिती किशोर मुंदडा,सरपंच अनिता पवार,उपसरपंच करण कासदेकर,मुन्नाभाऊ ठाकरे,राष्ट्रवादीचे राजू बोचे, गजेंद्र पाचडे,शिवराज गावंडे,श्रीयश चौधरी,शेतकरी जागर मंचचे कृष्णाभाऊ अंधारे, मनोज तायडे,ज्ञानेश्वर गावंडे उपस्थित होते यांच्यासह गावकरी उपस्थित होते


दत्तक गाव 'अजितनगर' नावाने ओळखले जाणार

अंधारात असणारे गाव महावितरणच्या सहकार्याने अजितपर्वच्या निमित्ताने प्रकाशमान झाले असून हे गाव दत्तक घेण्याची घोषणा अमोल मिटकरी यांनी केली असून राज्यात एक आदर्श विकासाचं मॉडेल या गावात तयार करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला असून राज्यस्तरावर हे गाव अजित नगर नावाने ओळखल्या जाईल असे प्रतिपादन आमदार अमोल मिटकरी यांनी केले.

प्रकाशपर्व
पुनर्वसित गावात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाला पहिल्यांदाच प्रकाशाची दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी गावातील अंधार दूर झाला आणि प्रकाशाचे पर्व सुरू झाल्याने 22 जुलै हा दिवस यापुढेही प्रकाशपर्व म्हणून आठवणीत राहील अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.
.........

टिप्पण्या