- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
परखड पत्रकार, सर्जनशील साहित्यिक वामनराव तेलंग यांचे निधन
मुंबई, दि. ११: परखड पत्रकार, सर्जनशील साहित्यिक म्हणून वामनराव तेलंग महाराष्ट्राच्या मनात कायम राहतील. एक गुणग्राहक संपादक, सर्जनशील साहित्यिक गमावल्याची भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वामनराव तेलंग यांच्या निधनाबद्दल व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री शोक संदेशात म्हणतात, तेलंग यांनी दैनिक तरूण भारतचे संपादक, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, विदर्भ साहित्य संघ येथे काम करताना आपला असा ठसा उमटविला. विदर्भात साहित्य तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रात येणाऱ्या तरूणांना तेलंग यांनी जाणीव पूर्वक प्रोत्साहन दिले. या त्यांच्या गुणग्राहकतेमुळे महाराष्ट्राला चांगले लेखक, पत्रकार मिळाले.
विदर्भातील पत्रकारितेत साहित्यिक अभिरूची रुजविण्याचे श्रेयही तेलंग यांना जाते.
परखड आणि प्रांजळ लेखन शैली हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य प्रत्यक्ष व्यक्तिमत्वातही होते. त्यांच्या जाण्याने गुणग्राहक संपादक, सर्जनशील साहित्यिक गमावला आहे. तेलंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
...............
अजित पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
ज्येष्ठ संपादक वामनराव तेलंग यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या साहित्यिक, पत्रकारितेच्या चळवळीचा मार्गदर्शक, प्रेरणास्रोत हरपला आहे. तेलंग साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली पत्रकार, साहित्यिकांची पिढी त्यांच्या कर्तृत्वाचा वारसा समर्थपणे पुढं नेईल, असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वामनराव तेलंग यांना श्रद्धांजली वाहिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात की, विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यवाह या नात्यानं तेलंग साहेबांनी महाराष्ट्रातील साहित्य चळवळ पुढं नेण्याचं काम केलं. नवोदित लेखकांना मार्गदर्शन करुन साहित्यिक ओळख मिळवून दिली. परखड लेखनाच्या माध्यमातून पत्रकारितेची प्रतिष्ठा वाढवली. त्यांच्या निधनानं विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक चळवळीची हानी झाली आहे
.........................
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा