Crop loan scam:पीककर्ज घोटाळा:विदर्भ ग्रामीण कोकण बँकेत ४ कोटीचा अपहार!

पीककर्ज घोटाळा:विदर्भ ग्रामीण कोकण बँकेत ४ कोटीचा अपहार!

सामान्य शेतकरीच नव्हेतर आमदाराच्या नावेही कर्जाची उचल!

शिवसेना आमदार नितीन देशमुख यांचे देखील कर्जमाफी यादीत नाव !!!


अकोला: एकीकडे पीक लागवडीसाठी कर्ज मिळत नसल्याने शेतकरीचा हंगाम वाया जाण्याचे चित्र अनेक वेळा आपण पाहिले आहे.तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या नावानेच परस्पर कर्ज काढून त्यांच्या नावाने कर्ज माफीचा फायदाही घेतला जात आहे.असाच एक पीक कर्ज घोटाळा अकोला जिल्ह्यातील चान्नी येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत समोर आला. या बँकेने बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्या नावानंही परस्पर कर्ज उचलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. तर मृत व्यक्ती आणि अस्तित्वात नसलेल्या व्यक्तीच्या नावानंही या बँकेत पैसे लाटण्यात आले आहे. 

अकोला जिल्ह्यातील पिंपळखुटा गावातील ज्ञानेश्वर आणि रामेश्वर मावलकर या दोन भावांना सध्या मोठा धक्का बसला. हा धक्का आहे, मरण पावलेल्या वडीलांच्या नावाने त्यांच्या मृत्यूनंतरही बँकेत झालेल्या व्यवहाराचा. वडील मोतीराम मावलकर यांचा २७ जून २०१८ ला मृत्यू झाला. मोतीराम मावलकर यांचे चान्नीच्या विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत पीक कर्जाचे खातं होते. मात्र, मोतीराम यांच्या मृत्यूनंतर ७ ऑगस्ट २०१८ ला मृत मोतीराम यांच्या अंगठ्याचा ठसा वापरून तब्बल ३६ हजार रूपये काढण्यात आले. बँकेतील भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोतीराम यांना मृत्यूनंतरही जीवंत करण्याची किमया केली. मूळ म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर ही हे कर्ज काढण्यात आले, याची माहिती त्यांच्या मुलांना सुद्धा नव्हती.

गैरव्यवहाराचा हा प्रकार फक्त सर्वसाधारण शेतकऱ्यानंपर्यन्तच मर्यादित राहिला नाही. बँकेतील या चांडाळ चौकडीने बाळापुरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनाही सोडल नाही. आमदार देशमुख यांनी या बँकेतून घेतलेल्या कर्जाचा संपुर्ण भरणा २० मार्च २०१७ पर्यंत केला होता. आमदार देशमुख तेंव्हा जिल्हा परिषद सदस्य होते. मात्र, देशमुख यांचं खातं निल असतांना कर्जमाफीच्या यादीत त्यांचं नाव आलं आणि हा प्रकार उघडकीस आला.आमदार देशमुख यांच्या नावानं बँकेत ७७ हजार रूपयांची परस्पर उचल झाली होती. आणखी एक प्रताप म्हणजे उमरा पांगरा येथे प्रकाश ओंकार जावळे नावाचा एकही व्यक्ती अस्तित्वात नाही. मात्र, या अस्तित्वात नसलेल्या व्यक्तीच्या नावानंही ९८ हजार रूपये लाटण्यात आले. बँक अधिकाऱ्यांनी सध्या पाच लाखांचा अपहार झाल्याची तक्रार पोलीसांत केली. मात्र, हा घोटाळा ४ कोटींच्या जवळपास असल्याची भिती आमदार देशमुख यांनी व्यक्त केली. मात्र, पोलीस यात गुन्हे दाखल करण्यास विलंब करीत असल्याचा आरोप सत्ताधारी आमदार देशमुख यांनी केला.

या प्रकरणी चान्नीच्या विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या सध्याच्या व्यवस्थापकांनी यासंदर्भात पोलीस तक्रार केली.या तक्रारीत गैरव्यवहाराचे म्होरके असलेल्या शाखेतील तीन तत्कालिन अधिकाऱ्यांची नावे आहे.मात्र, तक्रारीत त्रुटी असल्याने पोलिसांना अडचण येत असून पोलीस या प्रकरणातील सर्व गोष्टींचा अभ्यास करून गुन्हा दाखल करणार असल्याचे गणेश वनारे, ठाणेदार, चान्नी पोलीस स्टेशन, जि.  अकोला यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या पाठीशी असलेल्या सरकार ने या प्रकरणाची योग्य चौकशी करून शेतकऱ्यांना त्यांच्यासाठी असलेल्या योजनेचे लाभ मिळवून द्यावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

Crop loan scam: 4 crore embezzlement in Vidarbha Gramin Konkan Bank!


Borrowing in the name of not only ordinary farmers but also MLAs!



टिप्पण्या

  1. सौशयीत गुन्हेगार नावे द्यायला हवं गुन्हे करणाऱ्यांना वचक बसेल.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा