देशाची ढासळलेली आर्थिक स्थिती बदलण्यात मोदी अकार्यक्षम - प्रकाश आंबेडकर

देशाची ढासळलेली आर्थिक स्थिती बदलण्यात मोदी अकार्यक्षम - प्रकाश आंबेडकर
पुणे दि. ३ :  देशाची ढासळलेली आर्थिक स्थिती बदलण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अकार्यक्षम असून नेमके काय करायला पाहिजे जेणेकरून आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल, हेच कळत नसल्याने केंद्र सरकार त्रस्त झाले आहे. त्यामुळे त्यांच्या मार्फत येणार्‍या अफवांना बळी पडू नका, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

      जागतिक संघटनेने भारताला पूर्णपणे कंगाल म्हणून घोषित केले आहे. तशीच परिस्थिती चीनची झाली आहे म्हणून लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देता देता यांच्या नाकी नऊ आले आहे. चीन आणि भारत या दोघांची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. कोरोना पसरविला म्हणून चीनवर जगभरातून आरोप केला जात आहे. तर भारतात कोरोनाची परिस्थिती कशी हाताळावी हे पंतप्रधान मोदी यांना कळत नाही म्हणून देशातील आर्थिक व्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. दोघांनाही त्यांच्या देशातील लोकांना फसवायचे आहे आणि म्हणून जशी गावांमध्ये लुटुपुटूची लढाई होते तशाच पद्धतीने चीनचे अध्यक्ष आणि भारताचे पंतप्रधान या दोघांची लुटूपुटूची लढाई सीमेवर सुरु झाली आहे. कधी लडाख तर कधी आसाम  तर कधी सिक्कीम, अरुणाचल प्रदेश मध्ये ही लढाई दिसून येते. दोन्ही देशांची परिस्थिती अजून ही युद्धा सारखी झालेली नाही, किंवा दोन्ही देश युद्ध करू शकतात अशी परिस्थिती नाही. त्यामुळे भाजप आणि आर.एस.एस यांनी जो खेळ चालवलाय की चीनकडून आपल्याला धोका आहे. तर त्यांच्या अफवांना बळी पडू नका. मात्र चीनकडुन भारताला धोका निश्चित आहे. पण ते वेगळ्या कारणांमुळे, दोन्ही देश ढासळलेल्या आर्थिक परिस्थिती मुळे त्रस्त झाले असून आर्थिक स्थिती कशी सुधारावी हे या लोकांना कळत नाही. त्यामुळे दोन्ही देश त्रस्त झाले आहेत, त्यामुळे त्यांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे  यांनी दिली.
.........


टिप्पण्या