corona virus news:बुलडाणा जिल्हा कोरोना मुक्त झाल्याचा आनंद औटघटिकेचा;जळगाव जामोद येथे नवा पॉझिटिव्ह रुग्ण

बुलडाणा जिल्हा कोरोना मुक्त झाल्याचा आनंद औटघटिकेचा;जळगाव जामोद येथे नवा पॉझिटिव्ह रुग्ण

अकोला:बुलडाणा जिल्हा कोरोना मुक्त झाल्याची आनंदी वार्ता सर्वत्र पोहचत नाही तोच, जळगाव जामोद येथे नवा पॉझिटिव्ह रुग्ण आढल्यामुळे या आनंदावर विरजण पडले. जळगाव जामोद येथे एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने आता खळबळ उडाली आहे. बुऱ्हाणपूरला जाऊन आलेला हा पुरुष जळगाव मध्ये पोहोचल्यानंतर  तपासल्या गेल्या. त्यात तो पॉझिटिव्ह आढळला. काल ३ जणांना डिस्चार्ज दिल्यानंतर बुलडाणा जिल्हा कोरोनामुक्त झाल्याचा आनंद औट घटकेचा ठरला आहे.

महत्वाचे:

1. जळगाव जामोदमध्ये सन्नाटा.

2. पॉझिटीव्ह निघालेला व्यक्ती आंबे व केळी विक्रेता असल्याने चिंता वाढली.

3.वडिलांचाही चहाचा व्यवसाय.

4. घर मुख्य बाजारपेठेत वर्दळीच्या ठिकाणीच.

5. शेजारीच एक राष्ट्रीयकृत बँक तर एक पतसंस्था.

6.कुटुंबातील 8 ते 9 सदस्यांना केले क्वारन्टीन.

7. एक मात्र चांगले, २ दिवसांनी तो व्यक्ती स्वतःहून गेला प्राथमिक आरोग्य केंद्रात.


बुलढाणा जिल्हा कोरोनामुक्त झाल्याचा आनंद व्यक्त होत असतानाच, बऱ्हाणपूर येथून परतलेल्या दोघांपैकी एक व्यक्ती जळगाव जामोद मध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

विशेष म्हणजे आतापर्यंत जळगाव जामोदमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता, परंतु जिल्हा कोरोना मुक्त झाल्यावर मध्यप्रदेशातून जळगाव जामोद मध्ये कोरोना दाखल होणे, ही बाब चिंतेची बनली आहे. त्यात हा व्यक्ती हा मोठा आंबेविक्रेता व कच्च्या केळीचा विक्रेता असल्याने चिंतेत पुन्हा भर पडली आहे. या व्यक्तीचे घर शहराच्या मध्यवर्ती भागात बालाजी वार्डात असून, त्याच्या घराला लागूनच एक राष्ट्रीयकृत बँक व एक पतसंस्था असल्याने नेहमीच तिथे वर्दळ असते. आंब्याचे गोडाऊननही घराच्या मागेच आहे  व तिथूनच हा व्यवसाय चालायचा, दोन दिवसांपूर्वीच एक ट्रक आंबे तिथे उतरल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे त्या व्यक्तीचे वडील सध्या चहाची दुकाने बंद असल्याने घरातूनच चहा देण्याचे काम करत असल्याचेही कळते. या सर्व बाबींमुळे चिंता वाटणे सहाजिकच आहे.

जळगाव जामोद येथून हे दोन व्यक्ती ६ मे रोजी भल्या पहाटेच पोलिसांची नजर चुकवत निघाल्या होत्या.  ते परत आल्यानंतर दोन दिवसांनी जेव्हा त्यांना कळले की, तिथल्या अंत्यसंस्कार सहभागी एक मुलगा हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे, त्यामुळे या दोघांनी जळगाव जामोद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन ही माहिती दिली. त्यानंतर त्यांना खामगाव येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठविण्यात आले. त्यांचे घसा स्त्राव घेतल्यानंतर आज सकाळी त्यातील एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने शहरात एकच खळबळ उडाली.

प्राप्त माहितीनुसार त्या २ व्यक्तींच्या कुटुंबातील सर्वांना क्वारनटाईन करण्यात आले आहे. तर अजून यांच्या संपर्कात  कोण आले आहेत, त्याचाही शोध घेणे सुरु झाले आहे.

सध्या प्रशासनाने संपूर्ण जळगाव जामोद शहरच सील केले असून, शहरात निर्जंतुकीकणाचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. तर एकच सन्नाटा पसरल्यामुळे गावातील लोक हे स्वतःहूनच लॉक डाऊन झाले आहेत.


विना परवानगी राज्यच्या सीमा ओलांडल्या!

कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्याच्या सीमाबंदी असताना व परराज्यात तर परवानगी शिवाय प्रवेश बंद असतानाच, जळगाव जामोद येथून ते २ व्यक्ती मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूरला ६ मे रोजी कोणत्याही परवानगीशिवाय सहज गेले आणि परत आले.

जिल्हा ओलांडून जाताना जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी तर राज्य ओलांडून जायचे असेलतर डीआयजीची परवानगी बंधनकारक आहे. त्यासाठी मेडिकल टेस्ट व ऑनलाइन अर्ज भरणे या सर्व गोष्टी आहेत. विषयाची गंभीरता पाहूनच प्रवेशाची परवानगी मिळते व त्यानंतर अधिकृत पास दिला जातो.

मात्र,६ मे रोजी पहाटे नातेवाईक वारल्याचा निरोप आल्यानंतर जळगाव जामोद येथील ते दोघे सकाळीच टू व्हीलरने बऱ्हाणपूरकडे निघाले, ते अशा आडमार्गाने गेले की ज्या मार्गावर पोलीस बंदोबस्तच नाही. म्हणून ते सकाळी सहज गेले व संध्याकाळी परत आलेसुद्धा.

प्रशासनाने जिल्ह्याच्या व राज्याच्या सीमा कितीही सील केल्या असल्या तरी, अनेक मार्ग असे आहेत की, त्यातून सहज जाता- येता येते. अशा ठिकाणी पोलिसांची नजर असणे आवश्यक आहे. सध्या बुलढाणा जिल्ह्याच्या चारही बाजूंचे जिल्हे हे जवळजवळ रेड झोन'मध्ये आहेत. अशा परिस्थितीत अनेकजण कुठलीही परवानगी न काढता नागरिक दररोज आडमार्गाने जातात आणि येतात,ही वास्तविकता प्रशासनाला नाकारता येणार नाही

......

टिप्पण्या