लॉकडाउनमुळे अडकलेल्या व्यक्तींसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा

लॉकडाउनमुळे अडकलेल्या व्यक्तींसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा
अकोला,दि.२: लॉक डाऊनमुळे अकोला जिल्ह्यात अडकून पडलेले अन्य जिल्ह्यातील वा परप्रांतीय मजुर, नागरिक, विद्यार्थी, यात्रेकरु, प्रवासी, पर्यटक यांना आपापल्या गावी परत जाण्यासाठी शासनाने घालून दिलेले निर्बंध शिथिल केल्यानंतर आता अशा प्रवाशांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा जिल्हा प्रशासनाने सुरु केली असून  त्यासाठी शासनाने विहित केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करण्याबाबत अधिसुचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जारी केली आहे.
या अधिसुचनेनुसार, अकोला जिल्ह्यात अडकून पडलेल्या नागरिकांना बाहेर जाण्यासाठी  अकोला जिल्ह्यातून पासेस दिले जातील. त्यासाठी त्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अकोला जिल्हा प्रशासनाकडे अर्ज प्राप्त झाल्यानंतर तो अर्ज ज्या जिल्ह्यात जायचे आहे त्या जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात येईल. त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी  ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर त्यांना वाहतुक पास देण्यात येईल.
अकोला जिल्ह्यातील रहिवासी असलेले मात्र अन्य जिल्ह्यात अडकून पडलेल्या प्रवाशांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा. त्यांची मागणी अकोला जिल्ह्याकडे येईल त्यास ना हरकत प्रमाणपत्र अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडून दिले जाईल. ना हरकत प्रमाणपत्राशिवाय पासेस दिले जाणार नाहीत. कोणत्याही व्यक्तीस पास देण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी बंधनकारक असेल. अर्जासोबत वैद्यकीय तपासणी  प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. प्रतिबंधित क्षेत्र घोषित केलेल्या भागातील वा क्षेत्रातील व्यक्तीला परवानगी दिली जाणार नाही. ज्या कारणासाठी ज्या व्यक्तीला परवानगी देण्यात आली आहे त्याच व्यक्तीने त्या पासचा वापर करावा, गैरवापर झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अकोला जिल्ह्यात बाहेरुन आलेल्या व्यक्तिंना  वैद्यकीय तपासणी व त्यानंतर १४ दिवसांचे अलगीकरण बंधनकारक आहे. जिल्ह्यात दाखल झालेल्या  प्रवासी नागरिकांनी  संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना माहिती देणे आवश्यक आहे. मनपा हद्दीत मनपा आयुक्त, न पा हद्दीत मुख्याधिकारी व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी काढलेल्या कलम १४४ च्या आदेशान्वये अलगीकरणाचे आदेश निर्गमित करावे,असे अधिसुचनेत नमूद करण्यात आले आहे.
परप्रांतात व महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात जाण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुविधा
परप्रांतातील वा राज्यातीलच अन्य जिल्ह्यात जाण्यासाठी अकोला जिल्हा प्रशासनाने पोलीस दलाच्या सहयोगाने एक लिंक उपलब्ध करुन दिली आहे. यासंदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणजिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्य जिल्ह्यात जाण्यासाठी अकोला येथे अडकलेल्या प्रवाशांनी पासेस साठी जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही.  अडकून पडलेल्यानी  प्रवाशांनी घरबसल्या  पास मिळवावा. अकोला जिल्ह्यातून महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात  वा देशातील अन्य राज्यातील जिल्ह्यात जाण्यासाठी  मजूर / कामगार / पर्यटक / भाविक / विद्यार्थी व इतर व्यक्तींनी https://covid19.mhpolice.in/ या लिंक वर माहिती भरावी. (Upload Your Aadhar Card and Medical Certificate in Single  file)वैद्यकीय तपासणी अहवाल लावणे अनिवार्य आहे. ही माहिती भरल्यानंतर संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयास संपर्क साधण्यात येईल आणि संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडून  ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांनी दिलेल्या लिंक वर आपली माहिती भरुन प्रशासनास सहकार्य करावे.
अधिक माहीतीसाठी ०७२४-२४२४४४४ या क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केले आहे.
परप्रांतातील १६०७ मजूर
अकोला जिल्ह्यात लॉक डाऊन कालावधीत देशातील अन्य राज्यातील १६०७ मजूर अडकले असल्याची माहिती आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार,  आंध्रप्रदेशातील ९६,  आसाम मधील ७५, बिहर ६१, छत्तीसगड २०,  गुजरात ३, झारखंड ४३, कर्नाटक २, केरळ ९,  मध्यप्रदेश ८१०,  ओरिसा ३२,  पंजाब ५,राजस्थान ८८, तामीळनाडू १६, तेलंगणा १३३, उत्तरप्रदेश १७७, उत्तराखंड ८, पश्चिम बंगाल २९ असे एकूण १६०७ मजूर असल्याची माहिती  आहे. त्यातील सर्वाधिक परप्रांतिय मजूरांची संख्या  ६९७ ही अकोला तालुक्यात आहे त्या खालोखाल ३१९  तेल्हारा तालुक्यात आहेत, अशी माहिती  नोडल अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी दिली आहे.

टिप्पण्या