Corona:शहरातील तिघे चवथ्या चाचणी नंतरही पॉझिटिव्ह!

शहरातील तिघे चवथ्या चाचणी नंतरही पॉझिटिव्ह!

अकोला,दि.२३: जिल्ह्यात आज  एकूण २१ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात तिघा जणांचे अहवाल हे चौथ्या चाचणी अखेर पॉझिटीव्ह आल्याने त्यांचा कोरोनाशी संघर्ष अद्यापही जारी आहे,असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी स्पष्ट केले आहे.  दरम्यान आज पातूर येथील सात जणांना त्यांच्या पूर्ण उपचारानंतर सर्व अहवाल निगेटीव्ह आल्याने निरोप देऊन घरी सोडण्यात आले. या रुग्णांना निरोप द्यायला खुद्द जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा  अधिकारी-कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

जिल्ह्यात आज कोरोना चाचणीचे २१ अहवाल प्राप्त झाले. त्यात १८ अहवाल निगेटीव्ह असून उर्वरीत तीन जणांचे अहवाल हे चवथ्या चाचणीनंतर पॉझिटीव्ह आहेत. त्यामुळे या तिघा जणांचा उपचार कालावधी आणखी वाढला आहे.  हे तिघांपैकी दोघे जण हे बैदपूरा येथील तर एक जण अकोट फैल येथील आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजअखेर एकूण ५०३ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ४७२ अहवाल आले आहेत.  आजअखेर एकूण ४५६ अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले आहेत. आज अखेर ३१ अहवाल प्रलंबित आहेत.

आजपर्यंत एकूण ५०३ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३९२, फेरतपासणीचे ७८ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३३ नमुने होते. आजपर्यंत एकूण ४७२ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३६७ तर फेरतपासणीचे ७६ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे  २९ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ४५६ आहे. आज प्राप्त झालेल्या २१ अहवालात १८ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर तिघांचे अहवाल हे चौथ्या चाचणीअखेर पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे या तिघा रुग्णांना कोरोनाशी आणखी काही काळ झुंजावे लागणार आहे.

पातूर येथील सात जणांना घरी सोडले

दरम्यान आज पातूर येथील सात जणांना उपचार पूर्ण करुन पूर्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.  त्यांना निरोप देण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण , डॉ. अपूर्व पावडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. श्यामकुमार शिरसाम व अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सर्व जणांनी टाळ्या वाजवून रुग्णालयातून बाहेर पडणाऱ्या रुग्णांचे स्वागत केले.  यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बाहेर पडणाऱ्या रुग्णांना निरामय दीर्घायुष्य चिंतत त्यांच्यावर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्स, स्टाफ, नर्सेस, स्वच्छता कर्मचारी यांचे अभिनंदन केले. या सातही रुग्णांना आता इथून पुढले १४ दिवस घरातच अलगीकरणात रहावे लागणार आहे.

आता शिल्लक रुग्ण सातच

जिल्ह्यात एकूण १६ जण कोवीड बाधीत रुग्ण होते. त्यातील दोघे मयत झाले. आज(दि.२३) सात जणांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आता सात जण रुग्ण उपचार घेत आहेत. या सात जणांपैकी तिघांचे चौथे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर उर्वरीत दोघे भावंडे असून एक जण दुसऱ्या तपासणीत पॉझिटीव्ह आलेला तीन वर्षीय बालक व अन्य एक असे सात जण आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूत्रांनी दिली आहे.

आज ११ जण नव्याने दाखल झाले. आजअखेर जिल्ह्यात ३१ अहवाल प्रलंबित असून त्यात २५ प्राथमिक चार वैद्यकीय कर्मचारी तर दोन फेरतपासणीचे अहवाल आहेत. सद्यस्थितीत ४८ रुग्ण भरती आहेत. जिल्ह्यात आज अखेर ५२३ जण बाहेरुन आलेल्यांची संख्या आहे.  त्यापैकी १९७ जण गृह अलगीकरणात तर ११७ जण संस्थागत अलगीकरणात असे एकूण ३११ जण अलगीकरणात आहेत. १५५ जणांची अलगीकरणाची १४ दिवसांची मुदत पूर्ण झाली आहे तर विलगीकरणात आता ५३ जण दाखल आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली आहे.

टिप्पण्या