कोरोनामुळे अकोल्यात एक रुग्ण मृत्यूमुखी

कोरोनामुळे अकोल्यात एक रुग्ण  मृत्यूमुखी
मयत रुग्णाच्या संपर्कातील लोकांची तपासणी व परिसर सील

पाच नवे संदिग्ध दाखल

मृतदेहावर अंत्यसंस्कार

अकोला,दि.१५ : जिल्ह्यात आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार २५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. आज अखेर २३१ जणांचे अहवाल निगेटिव्ह असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह अहवाल संख्या मात्र १४ झाली आहे. सोमवार दि.१३ रोजी उपचारादरम्यान मरण पावलेल्या एका रुग्णाचा तपासणी अहवाल  पॉझिटीव्ह असल्याने पॉझिटीव्ह रुग्णाची संख्या १४ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान ह्या रुग्णाचा मृत्यू हा कोरोनामुळे झालेला जिल्ह्यातील पहिला मृत्यू असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने घोषित केले आहे. या आधी एका रुग्णाने आत्महत्या केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.
यासंदर्भात जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आज दिवसभरात (गेल्या २४ तासात) पाच जण संशयित रुग्ण म्हणुन दाखल झाले. या सगळ्यांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. आतापर्यंत ३०२ नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यापैकी २४५ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून २३१ निगेटिव्ह आहेत. तर १४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी दिली.
दरम्यान जिल्ह्यात बाहेरुन आलेल्या प्रवाश्यांची संख्या ३६२ असून त्यातील ७२ जण गृह अलगीकरणात तर ९५ जण संस्थागत अलगीकरणात आहेत. ३२ जण विलगीकरणात आहेत.  अद्याप १६२ जणांचे अलगीकरणाचे १४ दिवस पूर्ण झाले आहेत. अद्याप ५७ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून मिळाली आहे.
मयत रुग्णाच्या संपर्कातील लोकांची तपासणी व परिसर सील
दरम्यान सोमवारी (दि.१३) ज्या रुग्णाचा मृत्यू झाला त्या रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील २६ जणांना तपासणी साठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात येत आहे. या रुग्णाच्या तपासणी अहवाल सकाळी प्राप्त होताच प्रशासनाने आपली कारवाई गतिमान करत तात्काळ महम्मद अली रोड परिसरात कारवाई सुरु केली. हा भाग बैदपूरालगतच असल्याने तो आधीपासूनच प्रतिबंधित होता.  त्याठिकाणी लगेचच शोध मोहिम राबवून रुग्णाच्या अतिनिकटचे १६ तर दुरस्थ संपर्कातील १० अशा २६ जणांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आरोग्य तपासणी व वैद्यकीय निरीक्षणासाठी दाखल करण्यात आले. त्यांचे नमुने घेणे व तपासणी करण्याची कारवाई सुरु आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
अहवाल आल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार
सोमवार दि.१३ रोजी हा रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाला होता. त्याचा मृत्यू त्याच दिवशी रात्री साडेआठच्या सुमारास झाला होता. त्याचा संशयित रुग्ण म्हणून घशातील स्त्रावाचा नमुना घेतला होता. आज सकाळी अहवाल प्राप्त झाल्यावर तो रुग्ण पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर कोरोनाबाधीत रुग्णाच्या अंत्यसंस्कारासंदर्भात दिलेल्या दिशानिर्देशानुसार आज या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

टिप्पण्या