अकोल्यात आणखी एक रुग्ण कोरोना बाधित

अकोल्यात आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह
अकोल्यात आणखी एक रुग्ण कोरोना बाधित
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची माहिती
अकोला:कोरोना रुग्ण तपासणी बाबत नुकत्याच हाती आलेल्या अहवालानुसार *आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे,* हा रुग्ण अकोट फाईल परिसरातील रहिवासी आहे, हा भाग ही सील करण्याची कारवाई प्रशासनाने सुरू केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बुधवारी दिली आहे. आता विदर्भातील अकोल्यात  पॉझिटिव्ह रुग्ण संख्या दोन झाली आहे.


काल आढळला होता पहिला बाधित
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने अखेर मंगळवारी अकोल्यातही शिरकाव केला. अकोला जिल्ह्यातील एका रुग्णाला कोरोना विषाणूची बाधा झाली असून, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली. या रुग्णाचा पॉझिटिव्ह अहवाल मंगळवारी सायंकाळी प्राप्त झाल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.

एकीकडे राज्यात सर्वत्र कोरोनाचे रुग्ण आढळून येत असताना, अकोला जिल्ह्यात मात्र आतापर्यंत एकही रुग्ण आढळला नव्हता.  मंगळवारी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली.मात्र, नागरिकांनी घाबरून न जाता अधिक काळजी घ्यावी,असे प्रशासनाने सांगितले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत जिल्ह्यात १२३ संदिग्ध रुग्ण दाखल झाले असून, त्यापैकी ८५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अजुनही ३७ अहवाल प्रलंबित असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले होते. 


टिप्पण्या