प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन

प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन
राष्ट्राला एकसंध ठेवण्याच्या मूलमंत्र जतनाची आवश्यकता  

मुंबई, दि. १४ :  भारतीय संविधानाचे शिल्पकार प्रज्ञासूर्य, विश्ववंद्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १२९ वी जयंती. या निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्री निवासस्थानी येथे भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पूष्पहार अर्पण करून अभिवादन केले. डॉ. आंबेडकर यांचा राष्ट्राला एकसंध ठेवण्याचा मूलमंत्र जतन करणे ही त्यांना आदरांजली ठरेल, असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी अभिवादन संदेशात नमूद केले आहे. 
संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांचा बाबासाहेबांनी अंखडपणे पाठपुरावा केला. माणसाच्या जगण्यातल्या सामान्यांतील सामान्य गोष्टींबाबत डॉ. आंबेडकर यांचा अभ्यास होता. त्यांचे त्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोनातूनच चिंतन केले. त्यामुळे त्यांच्या सामाजिक, राजकीय, धर्म, संविधान, आर्थिक, शिक्षण, कृषी-सिंचन, कष्टकरी-कामगारांचे हक्क, महिलांचे सक्षमीकरण अशा सर्वस्पर्शी विचारांना जगभरात मान्यता मिळाली. आजही त्यांच्या या व्यासंगी मांडणीचा अभ्यास सुरुच आहे, ही त्यांच्या विचारांची ताकद आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या राष्ट्राची अमुल्य अशी संपत्ती आहे. अशा या महाराष्ट्र पुत्राचा सार्थ अभिमान आहे. त्यांचा वैचारीक ठेवा आपल्यालासाठी आयुष्यभरासाठी मार्गदर्शक शिदोरी आहे.  आधुनिक राष्ट्रनिर्मितीतील त्यांच्या योगदानासाठी कृतज्ञच राहायला हवे. विविधतेने नटलेल्या आपल्या राष्ट्राला एकसंध ठेवण्यासाठीचा त्यांचा मूलमंत्र जतन करणे हीच त्यांना आदरांजली ठरेल असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे. 
......

टिप्पण्या