- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
चित्रपट गृह, नाट्यगृह, तरण तलाव,जिम बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
अकोला,दि.१५: कोरोना विषाणू संर्गास प्रतिबंधात्मक व खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह, तरुण तलाव, खाजगी व शासकीय व्यायाम शाळा (जिम)पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज (दि.१५) निर्गमित केले.
या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार,
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी साथरोग अधिनियम १८९७ मधील खंड २,३ व ४ मधील तरतूदीनुसार करोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजनेचा एक भाग म्हणून अकोला जिल्ह्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह, तरुण तलाव, खाजगी व शासकीय जिम पुढील आदेश होईपर्यत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
सार्वजनिक कार्यक्रमांना दिलेल्या परवानग्या ही रद्द
कोरोना विषाणू फैलावास प्रतिबंध करण्यासाठी बहुसंख्येने लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सार्वजनिक जत्रा, यात्रा, तसेच अन्य धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा विषयक सर्व कार्यक्रम पुढील सूचना येईपर्यंत रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून अशा कार्यक्रमांना यापूर्वी देण्यात आलेल्या परवानग्या ही रद्द करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आज जारी केलेल्या आदेशान्वये कळविले आहे.
बाधित प्रदेशातुन आलेल्या प्रवाशांना विलगीकरण सक्तीचे
कोरोना विषाणू बाधित प्रदेशात गेल्या १४ दिवसात प्रवास करून कोणीही व्यक्ती अकोला जिल्ह्यात आला असल्यास त्यास स्वतःच्या घरात अथवा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या विलगिकरण कक्षात राहणे बंधनकारक करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिले आहेत.
या आदेशांचे उल्लंघन झाल्यास भारतीय दंड संहिता, (१८६० चा ४५ ) च्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल,असा इशाराही देण्यात आला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा