unique-protest-spurious-seeds: पैसे काय झाडावर उगवते? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल; निकृष्ट खतांच्या विक्रीविरोधात अनोखे आंदोलन



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: जिल्ह्यात बोगस बियाणे, पीजीआर, बायो उत्पादने आणि निकृष्ट खतांच्या विक्रीविरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटनेने गुरुवारी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर अनोखे आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या मेहनतीच्या पैशांची लूट करणाऱ्या कंपन्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी करत शेतकऱ्यांनी आपल्या मेहनतीचे पैसे झाडाला चिटकवून कृषी अधिकाऱ्यांना प्रतीकात्मक भेट दिली. या अनोख्या आंदोलनाची जिल्हाभर जोरदार चर्चा रंगली आहे.



क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. संघटनेने जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देत अकोला जिल्ह्यात बोगस पीजीआर, बायो उत्पादने, निकृष्ट खते आणि बोगस बियाण्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याचा आरोप केला.या उत्पादनांमुळे बियाण्यांची उगवण न होणे, पिकांची वाढ खुंटणे, उत्पादनात घट होणे आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. संघटनेने जिल्ह्यातील संशयित कंपन्यांची तात्काळ तपासणी करून त्यांच्या उत्पादनांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवावेत, तपासणी पूर्ण होईपर्यंत संबंधित उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घालावी आणि दोषी आढळणाऱ्या कंपन्या, उत्पादक, वितरक व विक्रेत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.त्याच प्रमाणे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागाने नुकसान भरपाई कंपन्यांकडून मिळवून द्यावी, अशी मागणी सुद्धा करण्यात आली.


यावेळी आंदोलन अधिक लक्षवेधी करण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःच्या कष्टाने कमावलेल्या पैशांच्या नोटा झाडावर चिटकवून कृषी अधिकाऱ्यांना प्रतीकात्मक भेट दिली. "शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांची बोगस कंपन्यांकडून लूट होत आहे," असा संदेश या आंदोलनातून देण्यात आला. 



पैसे काय झाडावर उगवते का, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी आंदोलन द्वारा उपस्थित केला आहे. या अनोख्या आंदोलनाची सध्या अकोला जिल्हाभर मोठी चर्चा सुरू असून प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी सर्व आंदोलनकर्त्यांनी केली.



टिप्पण्या