three-corporators-suspended: अकोला महापालिकेतील तीन नगरसेवक निलंबित; अवैध जात प्रमाणपत्रामुळे आयुक्तांची कारवाई



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोला महापालिकेतून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. अवैध जात प्रमाणपत्र प्रकरणात अकोला महापालिकेतील तीन नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या निर्णयामुळे महापालिकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.


निलंबित करण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये प्रभाग क्रमांक १६ (ब) येथील अमरीन सदफ सय्यद नाझीम (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट), प्रभाग क्रमांक २ (अ) येथील सीमा अंजुम शेख अनिस (एमआयएम) आणि प्रभाग क्रमांक १ (अ) येथील शेख अब्दुल्ला शेख सलीम (काँग्रेस) यांचा समावेश आहे.या तिन्ही नगरसेवकांचे जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. 


तिन्ही नगरसेवक आरक्षित जागांवरून निवडून आले होते. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे संबंधित नगरसेवकांकडून सांगितले जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी हा आदेश जारी केला आहे. या कारवाईमुळे अकोला महापालिकेतील सत्ताधारी भाजप प्रणीत शहर विकास आघाडीच्या संख्याबळावरही परिणाम झाला आहे. कारण निलंबित सदस्यांमध्ये एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या आघाडीतील दोन सदस्यांचा समावेश आहे. दरम्यान, भाजपच्या आणखी एका नगरसेवकावरही अशाच प्रकारच्या कारवाईची टांगती तलवार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.



टिप्पण्या