green-vasudha-campaign-akl-: अकोला जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी 'ग्रीन वसुधा' अभियान; केवळ वृक्षारोपण नव्हे, तर वृक्षसंवर्धनाची चळवळ- जेसीआय



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : विक्रमी 47 अंश सेल्सिअस तापमानामुळे अकोल्याची ओळख देशातील उष्ण शहरांमध्ये झाली आहे. ग्लोबल वॉर्मिंग आणि पर्यावरणीय ऱ्हासामुळे संपूर्ण जग गंभीर संकटाचा सामना करत आहे. दरवर्षी लाखो झाडे लावली जातात; मात्र त्यातील मोठा हिस्सा काही महिन्यांतच नष्ट होतो. म्हणून केवळ वृक्षारोपण नव्हे, तर वृक्ष जगविणे हीच काळाची खरी गरज बनली आहे. वृक्ष जगले, तरच मानवी सृष्टी टिकेल. याच पार्श्वभूमीवर जेसीआय अकोला सिटीच्या पुढाकारातून, पीएसव्ही नर्सरी तसेच असोसिएशन ऑफ रिजनल ऑइल मिलर्स ऑफ अकोला अर्थात अरोमा असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील विद्यार्थी, शाळा व महाविद्यालयांसाठी 'ग्रीन वसुधा अभियान' राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जबाबदारीची भावना निर्माण करून "एक विद्यार्थी – एक वृक्ष – एक जबाबदारी" हा संकल्प रुजविणे आणि अकोल्याला हरित बनविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याची माहिती जेसीआय अकोला सिटीचे अध्यक्ष अमोल अग्रवाल, सचिव अभय राठी, प्रकल्प संचालक डॉ. प्रिया वखारिया, जेसीआय अकोला सिटी व पीएसव्ही नर्सरी, तसेच प्रकल्प संचालक लक्ष्मीकांत डागा, अमित पडगीलवार, जेसीआय अकोला सिटी व असोसिएशन ऑफ रिजनल ऑइल मिलर्स ऑफ अकोला अर्थात अरोमा असोसिएशन यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.


यावेळी त्यांनी सांगितले, "यंदा आम्ही किती झाडे लावली हे मोजणार नाही; किती झाडे जगविली हे मोजणार आहोत. हाच 'ग्रीन वसुधा' अभियानाचा खरा उद्देश आहे."शिक्षण विभागाच्या 1 लाख 80 हजार वृक्षलागवडीच्या उद्दिष्टाला हातभार लावण्यासाठी हे अभियान 1 ऑगस्ट 2026 ते 15 जानेवारी 2027 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

1 ते 31 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यातील शाळा, विद्यालये व महाविद्यालयां मधील विद्यार्थी आपल्या शाळा व परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करतील. सहभागी विद्यार्थी व शाळांना ग्रीन वसुधाच्या वतीने मोफत रोपे उपलब्ध करून देण्यात येणार असून यासाठी ईश्वर गट्टानी, वसुधा हॉस्पिटल आणि अरोमा असोसिएशन यांचे आर्थिक सहकार्य लाभत आहे. 

या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे वृक्षसंवर्धना वर विशेष भर असून वृक्षारोपणानंतर 1 ऑगस्ट ते 15 जानेवारी या कालावधीत प्रत्येक झाडाची नियमित निगा, पाणी, संरक्षण आणि वाढ यावर लक्ष ठेवले जाणार आहे. सहभागी विद्यार्थी व शाळांनी दर महिन्याला लावलेल्या वृक्षाचे छायाचित्रासह मासिक प्रगती अहवाल ग्रीन वसुधा अभियानाच्या व्हॉट्सॲपवर पाठविणे आवश्यक राहील. लावण्यात आलेल्या वृक्षांचे संगोपन व संवर्धनाचे परीक्षण ऑक्सिजन मॅन षण्मुख नाथन, सहाय्यक वन अधिकारी नम्रता ताले, महाबीजचे सेवानिवृत्त अधिकारी श्यामलाल तिबुडे, पर्यावरण तज्ज्ञ उदय वझे आणि रानवारा संस्थेच्या अध्यक्ष पल्लवी दिवेकर यांच्या तज्ज्ञ समितीकडून करण्यात येणार आहे. 


26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी, वन अधिकारी यांच्या उपस्थितीत उत्कृष्ट वृक्षसंवर्धन करणाऱ्या विद्यार्थी, शाळा व महाविद्यालयांचा 'सिटी चॅम्पियन पुरस्कार' देऊन गौरव करण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट वृक्षसंवर्धन पुरस्कार, सहभाग प्रमाणपत्र आणि इतर विशेष सन्मान प्रदान करण्यात येतील. पुरस्कार केवळ वृक्षारोपणासाठी नव्हे, तर झाडे यशस्वीपणे जगविल्याबद्दल दिले जाणार आहेत.


या अभियाना दरम्यान वृक्षसंवर्धन जनजागृती, पथनाट्य, नाटिका, नागरिक संवाद आणि विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. वृक्षारोपण उपयुक्त व योग्य ठिकाणी करण्यावर भर दिला जाणार असून, सहभागी सर्व विद्यार्थी व शाळांनी लावलेल्या वृक्षांचा मासिक प्रगती अहवाल सादर करणे आवश्यक राहील. या संदर्भात प्राथमिक शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व शाळांना सूचना देण्यात आल्या असून विद्यार्थी, पालक आणि शाळांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून आपले सामाजिक दायित्व पार पाडावे, असे आवाहन करण्यात आले. ग्रीन वसुधा' हे केवळ वृक्षारोपण अभियान नसून अकोल्याला पुन्हा हरित, थंड आणि पर्यावरणपूरक बनविण्याचा सामाजिक संकल्प आहे. आजचा प्रत्येक विद्यार्थी एका झाडाची जबाबदारी स्वीकारेल, तर उद्याचा अकोला अधिक हिरवा, सुरक्षित आणि समृद्ध बनेल अशी आशा या माध्यमातून व्यक्त करण्यात येत आहे.


या अभियानाच्या यशस्वीतेसाठी डॉ. दीपक वखारिया, डॉ. संकेत वखारिया, संजय श्रावगी, नितीन भारूका, आनंद अग्रवाल, संदीप अग्रवाल, गौतम श्रावगी, सुमित बंसल, संकल्प गजघाटे, जयेश लगड, रेवती ढोरे, ज्ञानेश्वरी बनकर, सीए रजनी कलंत्री, पलक खंडेलवाल, भवांनी शाह, डॉ. सुचिता मोहता, सीए पायल गट्टानी, सीए निधी लदनिया, पूजा अग्रवाल, आर्कि. चंचल राठी, ॲड. वर्षा लाहोटी, अपूर्वा पडगिलवार, मेघ राठी, स्मिता डागा, ममता मुंदडा, श्वेता लाहोटी, अनोखी झुनझुनवाला, सीए कोमल मालाणी, विशाखा धूत, मोनिका राठी, मो. झुबेर, मोहम्मद तारीक यांच्यासह जेसीआय अकोला सिटी, पीएसव्ही नर्सरी आणि अरोमा असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व स्वयंसेवक परिश्रम घेत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

टिप्पण्या