akola-court-balapur-ndps-act: ११२ किलो गांजा जप्ती प्रकरणातील दोन आरोपींना जामीन मंजूर; ॲड. एम. बी. शर्मा यांचा प्रभावी युक्तिवाद

विशेष NDPS न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश 

प्रत्येकी २ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटकेचे निर्देश

ॲड. एम. बी. शर्मा (मधुसूदन शर्मा) यांचा प्रभावी युक्तिवाद 




नीलिमा शिंगणे जगड 

अकोला | भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला जिल्ह्यातील बाळापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या 112 किलो गांजा जप्तीच्या प्रकरणात दोन आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे. विशेष NDPS न्यायालयाचे न्यायाधीश प्रदीप बापूराव नाईकवाड यांनी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी हा आदेश दिला. मोहम्मद अस्लम मोहम्मद आझम आणि मोहम्मद अजमल मोहम्मद अजम या दोन्ही आरोपींची प्रत्येकी २ लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तेवढ्याच रकमेच्या एक किंवा दोन सक्षम जामीनदारांच्या हमीवर सुटका करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.


या प्रकरणात आरोपींवर ११२.०९ किलो गांजा जप्त केल्याचा आरोप असून, जप्त मुद्देमालाची किंमत २५ लाख ७८ हजार ५७ रुपये असल्याचे पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.




थोडक्यात हकीकत अशी की, ८ एप्रिल २०२६ रोजी बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४०/२०२६ नोंदविण्यात आला होता. या प्रकरणात आरोपींच्या वाहनातून तीन गोण्यांमध्ये एकूण ११२.०९ किलो गांजा आढळून आला असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

पोलिसांनी संबंधित मुद्देमाल जप्त करून आरोपींना अटक केली होती. त्यानंतर दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत होते. त्यांच्याविरुद्ध अंमली पदार्थ आणि मनःप्रभावी पदार्थ अधिनियम, १९८५ अर्थात NDPS कायद्याच्या कलम ८(क) आणि २०(ब)(ii) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.


आरोपींचे वकिल एम. बी. शर्मा यांचा प्रभावी युक्तिवाद


न्यायालयात आरोपींनी ॲड. एम बी. शर्मा यांच्या मार्फत जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. यावेळी ॲड. शर्मा यांनी आरोपींची बाजूने प्रभावीपणे विविध मुद्दे न्यायालयासमोर मांडले.


बचाव पक्षाचे प्रमुख मुद्दे  


- आरोपी ८ एप्रिल २०२६ पासून कारागृहात असून तपास पूर्ण झाला आहे.

- पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला असल्याने पुढील तपासासाठी आरोपींना कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला.

- गांजा जप्तीच्या कारवाईत NDPS कायद्यातील काही अनिवार्य तरतुदींचे पालन झाले नसल्याचा दावा बचाव पक्षाने केला.

- जप्त गांजाचे नमुने घेण्याची आणि ते न्यायालयात सादर करण्याची प्रक्रिया नियमानुसार झाली नसल्याचा आक्षेप घेण्यात आला.

- प्रथम माहिती अहवाल (FIR) आणि घटनास्थळ पंचनाम्यातील मजकुरात फरक असल्याचे बचाव पक्षाने नमूद केले.

- अटकेची कारणे आरोपींना योग्य प्रकारे समजावून सांगण्यात आली नसल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला.

- आरोपींपैकी संबंधित अर्जदाराच्या वतीने कर्करोगाने ग्रस्त असल्याचा आणि उपचारांची आवश्यकता असल्याचाही युक्तिवाद करण्यात आला.


न्यायालयाचा आदेश काय?


विशेष NDPS न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज मंजूर केला. आदेशानुसार, दोन्ही आरोपींना प्रत्येकी २ लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तेवढ्याच रकमेच्या एक किंवा दोन सक्षम जामीनदारांच्या हमीवर सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच जामिनासाठी न्यायालयाने  अटी व शर्ती घातल्या आहेत.



ठळक मुद्दे

न्यायालय : विशेष NDPS न्यायालय, अकोला

न्यायाधीश : प्रदीप बापूराव नाईकवाड

आदेशाची तारीख : २३ ऑक्टोबर २०२६

पोलीस ठाणे : बाळापूर, जिल्हा अकोला

गुन्हा क्रमांक : ३४०/२०२६

लागू कायदा : NDPS कायदा, १९८५ — कलम ८(क), २०(ब)(ii)




भारतीय अलंकार न्यूज 24


अकोल्यासह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्याशी जोडलेले राहा.



टिप्पण्या