court-update-crime-news-amt: अल्पवयीन मुलीचे अपहरण व अत्याचार प्रकरण: आरोपी धीरज सोनोने पुराव्याअभावी निर्दोष मुक्त
भारतीय अलंकार न्यूज 24
दर्यापूर (जि. अमरावती) : अल्पवयीन मुलीच्या अपहरण व अत्याचाराच्या आरोपातून आरोपी धीरज सुरेश सोनोने याची दर्यापूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश-२ एम. आय. लोकवानी यांनी २८ जुलै २०२६ रोजी हा निकाल दिला.
दर्यापूर पोलीस ठाण्यात अपराध क्र. २३८/२०२२ अन्वये आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३६३, ३६६, ३७६(२)(एन) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रकरणानुसार, पीडित मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आजीने पोलीस ठाण्यात दाखल केली होती. तपासादरम्यान पीडिता व आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाले होते. पीडितेने आरोपीसोबत प्रेमसंबंध असल्याचे तसेच दोघे सोबत राहत असल्याचे जबाबात नमूद केले होते.
खटल्याच्या सुनावणीदरम्यान अभियोग पक्षाकडून सादर करण्यात आलेल्या पुराव्यांमध्ये त्रुटी आढळून आल्या. पीडिता व तिच्या आईने न्यायालयात आरोपीविरोधात प्रतिकूल साक्ष दिली नाही. तसेच पीडिता अल्पवयीन असल्याचे सिद्ध करणारे ठोस दस्तऐवजही अभियोग पक्षाकडून सादर करण्यात आले नाहीत.
आरोपीविरुद्धचे आरोप संशयाच्या पलीकडे सिद्ध करण्यात अभियोग पक्ष अपयशी ठरल्याने न्यायालयाने आरोपी धीरज सुरेश सोनोने याची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली.
आरोपीतर्फे ॲड. चंद्रकांत एन वानखडे, यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड. कांचन शिंदे, ॲड. असद खान, ॲड. एम. ए. परवेज अरमानी, ॲड. सुमेध डोंगरदिवे, ॲड. प्रवीण पोहरे, ॲड. अनवर शेरा, ॲड. कांचन ननिर, ॲड. सुनीता गवई, आणि ॲड. केशनी खंडेराव यांनी सहकार्य केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा