jamvasu-barshitakli-crime-akl: जामवसू येथील थरार : तिघांना बेड्या; गुन्ह्यात वापरलेली बोलेरो पिकअप जप्त, बार्शीटाकळी पोलिसांची धडक कारवाई

जागेच्या वादातून घरावर घातली पिकअप गाडी; वृद्धेचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर जखमी!



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

बार्शीटाकळी (अकोला): घराजवळील जागेच्या जुन्या वादातून संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याचा नियोजनबद्ध कट रचून पिकअप गाडी अंगावर घालून ७५ वर्षीय सोनाबाई मखराम जाधव या वृद्धेचा खून केल्याची धक्कादायक घटना जामवसू (ता. बार्शीटाकळी) येथे घडली. या घटनेत अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बार्शीटाकळी पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत या प्रकरणातील तिन्ही आरोपींना जेरबंद केले असून गुन्ह्यात वापरलेले वाहनही जप्त केले आहे.


घटनेचा संक्षिप्त तपशील 

फिर्यादी जगदीश मखराम जाधव (वय ३८, रा. जामवसू) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी बबन घुगे याने जागेच्या वादावरून संगनमत करून फिर्यादीसोबत वाद घालत शिवीगाळ केली. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाला संपवण्याच्या उद्देशाने आरोपीने फिर्यादीच्या आईच्या अंगावर बोलेरो पिकअप (क्रमांक: MH-30-L-4495) घातली. एवढ्यावरच न थांबता आरोपीने फिर्यादीच्या इतर कुटुंबियांच्या अंगावरही वारंवार गाडी नेली. या भीषण हल्ल्यात फिर्यादीच्या आईच्या डोक्याला व छातीला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला; तर फिर्यादीचे भाऊ, बहीण आणि वहिनी गंभीर जखमी झाले.

गुन्ह्याची नोंद फिर्यादीच्या तक्रारीवरून बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ६०५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३(१), १०९(१), ११५(२), ३५१, ३५२, ३२४(६), २९६ आणि ३(५) अन्वये खुनाचा व प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेतील ठळक मुद्दे:

  • जागेचा वाद ठरला कारण: घराजवळील जागेच्या वादातून रचला गेला नियोजनबद्ध कट.

  • क्रूर हल्ला: आरोपीने जाणीवपूर्वक बोलेरो पिकअप कुटुंबातील सदस्यांच्या अंगावर नेली.

  • एकीचा मृत्यू, तिघे जखमी: वृद्ध मातेचा जागीच मृत्यू; भाऊ, बहीण व वहिनी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू.

  • पोलिसांची तत्परता: गुन्हा दाखल होताच गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे अवघ्या काही तासांत आरोपींना अटक.

  • मुद्देमाल जप्त: गुन्ह्यात वापरलेली बोलेरो पिकअप गाडी पोलिसांनी केली जप्त.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई घटनेचे गांभीर्य पाहून अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी आरोपींना तातडीने अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शीटाकळी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक आनंद कांदे व त्यांच्या पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे कारवाई करत मुख्य आरोपी बबन घुगे व दोन महिला आरोपी अश्या एकूण ३ आरोपींना बेड्या ठोकल्या.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक आनंद कांदे व बार्शीटाकळी पोलीस पथक करत आहे.


टिप्पण्या