akola-west-election-petition-hc: अकोला पश्चिम निवडणूक याचिकेकडे संपूर्ण पश्चिम विदर्भाचे लक्ष; कोर्टाने CCTV आणि फॉर्म 17-A मागवले
भारतीय अलंकार न्यूज 24
नागपूर : 30-अकोला पश्चिम विधानसभा निवडणूक याचिका क्र. 5/2025 कडे आता संपूर्ण पश्चिम विदर्भाचे लक्ष लागले आहे. बॉम्बे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या प्रकरणात महत्त्वाचे आदेश देत सर्व कागदपत्रे आणि पुरावे मागवले आहेत. न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या खंडपीठासमोर मनपा स्थायी समिती सभापती आणि भारतीय जनता पक्षाचे माजी उमेदवार विजय कमलकिशोर अग्रवाल विरुद्ध साजिद खान पठाण (अकोला पश्चिमचे विद्यमान आमदार) प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 सप्टेंबर रोजी होणार आहे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत विजय अग्रवाल हे भाजपाकडून अकोला पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार होते. त्यांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप करत ही याचिका दाखल केली आहे.
कोर्टाने निश्चित केलेले 7 महत्त्वाचे मुद्दे:
1. दुबार मतदार: 1125 मतदारांची नावे 30-अकोला पश्चिम आणि 29-बाळापूर या दोन्ही मतदार याद्यांमध्ये एकाच वेळी आहेत का?
2. दुबार मतदान: वरील 1125 मतदारांनी 20-11-2024 रोजी दोन्ही मतदारसंघात मतदान केले का?
3. एकापेक्षा जास्त ठिकाणी नाव: 3614 मतदारांची नावे एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी आहेत का?
4. एकापेक्षा जास्त वेळा मतदान: वरील 3614 मतदारांनी अकोला पश्चिम मध्ये एकापेक्षा जास्त वेळा मतदान केले का?
5. अवैध मतांमुळे निकाल प्रभावित: अवैध मतांची गणना झाल्यामुळे साजिद खान पठाण यांचा विजय प्रभावित झाला का?
6. 472 मतांची मोजणी नाही: मतदान केंद्र क्र. 203 - शिवाजी हायस्कूल मधील 472 मतांची मोजणी झाली नाही आणि त्यामुळे निकालावर परिणाम झाला का?
7. निवडणूक रद्द होणार का: साजिद खान पठाण यांची निवड रद्द करता येईल का?
कोर्टाचा आदेश:
1. सर्व पक्षकारांनी 15 दिवसांच्या आत साक्षीदारांची यादी द्यावी.
2. जिल्हा निवडणूक अधिकारी, अकोला यांनी 30-अकोला पश्चिम आणि 29-बाळापूर मधील सर्व मतदान केंद्रांचे फॉर्म 17-A, मतदार याद्या आणि CCTV फुटेजची सॉफ्ट कॉपी 4 आठवड्यात याचिकाकर्त्याला द्यावी.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा