political-news-gmc-akola-city: तीन दिवसात व्हीलचेअर-स्ट्रेचरची सोय करा; आमदार नितीन देशमुखांची तंबी



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: सर्वोपचार रुग्णालयात व्हीलचेअर आणि स्ट्रेचर यांसारख्या अत्यावश्यक सुविधांच्या अभावामुळे एका विवश पत्नीला 'ब्रेन स्ट्रोक' आलेल्या आपल्या पतीला पाठीवर उचलून उपचारासाठी रुग्णालयभर फिरावे लागल्याची संतापजनक घटना समोर आली. सोमवारी उद्धवसेनेचे उपनेते तथा आमदार नितीन देशमुख यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धडक देत अधिष्ठाता डॉ. संजय सोनुने यांना जाब विचारत प्रशासनाची लाज काढली. पुढील तीन ते चार दिवसांत व्हीलचेअर, स्ट्रेचर व अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध न केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला.



आमदार नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, मुकेश मुरूमकार यांनी प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिकांसह थेट अधिष्ठाता कार्यालय गाठून जाब विचारला. संबंधित महिला तिच्या पतीला पाठीवर घेऊन फिरत असताना तेथे उपस्थित असलेले वार्डबॉय तसेच इतर कर्मचारी काय करत होते? असा संतप्त सवाल आमदार देशमुख यांनी उपस्थित केला. या प्रश्नावर वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. संजय सोनूने समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. 

यावेळी आमदार देशमुख यांनी रुग्णालयातील विविध वार्डांमध्ये गंभीर रुग्णांना खाटा उपलब्ध नसल्याने जमिनीवर उपचार घ्यावे लागत असल्याची बाबही अधोरेखित केली. यावेळी उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक शंकर लंगोटे, सुरेंद्र विसपुते, अतुल पवनिकर, जिल्हासंघटक भूषण भिरड, तालुका प्रमुख संजय भांबेरे, ज्ञानेश्वर गावंडे, ज्ञानेश्वर म्हैसणे, शहरप्रमुख आशिष गावंडे (अकोला पश्चिम), शहरप्रमुख राहुल कराळे (अकोला पूर्व), मनपा गटनेते विजय इंगळे, नगरसेवक अभय खुमकर, योगेश गोतमारे, रामभाऊ आमले, अभिषेक खरसाडे, दत्ता पाटील, सोनू औतकार, हर्षल पाटील, साकलेन खान पठाण, गजानन फुंडकर, अश्विन कपले, दीपक लोनाग्रेकर, आस्तिक चव्हाण, प्रज्वल बोंद्रे, ओम गावंडे, विलास तंवर, नरेंद्र सावळे, विकेश हिरणवाडे आदी शिवसैनिक उपस्थित होते. 


दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करा

संबंधित महिलेच्या पतीची गंभीर अवस्था लक्षात घेता तिच्या मदतीसाठी वार्डातील कर्मचारी पुढे आले नाहीत. अशा दोषी कर्मचाऱ्यांसह सुरक्षा रक्षकांवरही कारवाई करण्याची सूचना आमदार देशमुख यांनी यावेळी केली. 


स्वच्छतेचा बोजवारा; पार्किंगची मुदत संपली

जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वच्छतेच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटदाराला लाखो रुपयांचे मानधन अदा केले जात असले तरीही साफसफाईचा बोजवारा उडाल्याचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी सांगितले. पार्किंगची मुदत संपल्याने वाहनधारकांजवळून अनधिकृतपणे शुल्क वसूल केले जात असल्याकडेही जिल्हाप्रमुख दातकर यांनी लक्ष वेधले.

टिप्पण्या