MIFF2026-marathi-cinema-akl: मिफ्फ-2026 मध्ये अकोल्याचा गौरव; साहिल इंगळे यांच्या लघुपटाचा भारतीय प्रीमियर

कान्स चित्रपट महोत्सवात झळकलेल्या ‘अ डॉल मेड अप ऑफ क्ले’चा आता मुंबईत विशेष स्क्रीनिंग; मराठी लघुपट व माहितीपट महोत्सवात निवड



ठळक मुद्दे :
*मिफ्फ-2026 निमित्त फिल्मसिटीकडून मराठी लघुपट-माहितीपट महोत्सवाचे आयोजन
*19 निवडक मराठी लघुपट आणि माहितीपटांचा समावेश
*अकोल्याच्या साहिल इंगळे यांच्या ‘अ डॉल मेड अप ऑफ क्ले’चा भारतीय प्रीमियर
*18 जून रोजी एनएफडीसी ऑडी-1 येथे चित्रपटाचे प्रदर्शन
*कान्स चित्रपट महोत्सवातील 'ला सिनेफ' विभागात अधिकृत निवड मिळवणारा एकमेव भारतीय चित्रपट



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला, दि. 16 : मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 (मिफ्फ) च्या निमित्ताने दादासाहेब फाळके चित्रनगरी च्या वतीने मराठी भाषेतील निवडक 19 लघुपट आणि माहितीपटांचा विशेष महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन आज पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी च्या लघु नाट्यगृहात उत्साहात पार पडले.

या महोत्सवामध्ये अकोल्याच्या साहिल इंगळे या तरुण निर्मात्याने तयार केलेल्या ‘अ डॉल मेड अप ऑफ क्ले’ या लघुपटाचा भारतीय प्रीमियर होणार असून, ही अकोल्यासाठी अभिमानाची बाब ठरत आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन 18 जून रोजी सकाळी 11:30 वाजता एनएफडीसीच्या ऑडी-1 येथे आयोजित करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, साहिल इंगळे यांच्या या लघुपटाने यापूर्वीच जागतिक स्तरावर आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. प्रतिष्ठित कान्स चित्रपट महोत्सव 2025 मधील 'ला सिनेफ' (La Cinef) विभागात या चित्रपटाची अधिकृत निवड झाली होती. या विभागात निवड मिळवणारा तो एकमेव भारतीय चित्रपट ठरला होता.

मराठी चित्रपटसृष्टीतील नवोदित तसेच प्रस्थापित दिग्दर्शकांच्या कलाकृतींना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या विशेष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

अकोल्याच्या साहिल इंगळे यांच्या यशामुळे विदर्भातील नवोदित कलाकार आणि चित्रपटनिर्मात्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक प्रतिभेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळण्याचा मार्ग अधिक खुला होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.




टिप्पण्या