dpc-meeting-akola-west-issue: अकोला पश्चिमच्या प्रश्नांवर आ. साजिद खान पठाण यांचा डीपीसीच्या बैठकीत प्रभावी पाठपुरावा
रस्ते, टीबी लॅब, लाडकी बहीण, पोलीस ठाणे स्थलांतर आणि २५० कुटुंबांच्या पुनर्वसनाच्या मुद्द्यावर वेधले लक्ष
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळावा आणि विकासकामांना गती मिळावी यासाठी आमदार साजिद खान पठाण यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रभावी मांडणी केली. पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांनी रस्ते, आरोग्य, क्रीडा, महिला कल्याण, प्रशासकीय सुविधा आणि पुनर्वसनाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर प्रशासनाचे लक्ष वेधले.
तपे हनुमान मंदिर, अग्रसेन चौक ते शहीद अब्दुल हमीद चौक या प्रमुख मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार पठाण यांनी केली.
जिल्हा क्रीडा विभागामार्फत फुटबॉल व कुस्ती स्पर्धांचे आयोजन करून ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही आमदार पठाण यांनी केली. यामुळे स्थानिक प्रतिभेला वाव मिळून युवकांमध्ये क्रीडाविषयक वातावरण निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत अनेक पात्र महिलांचे केवायसी पूर्ण न झाल्यामुळे त्यांना लाभ मिळालेला नाही. या महिलांना न्याय मिळण्यासाठी केवायसी पूर्ण करण्याची मुदत वाढविण्याची आवश्यकता असल्याचे आमदार पठाण यांनी नमूद केले. तसेच अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून मूलभूत रस्त्यांची कामे हाती घेण्याची मागणीही त्यांनी केली.
जुन्या शहरातील पोलीस ठाणे गर्दीच्या भागात असल्याने नागरिक व भाविकांना वारंवार गैरसोयीचा सामना करावा लागतो. त्यामुळे हे पोलीस ठाणे हरिहर पेठ परिसरात स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. तसेच आरटीओ कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधत त्याच्या विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली.
बैठकीत मांडण्यात आलेल्या विविध प्रश्नांमुळे अकोला पश्चिममधील नागरिकांच्या अपेक्षांना बळ मिळाले असून विकासकामांना गती मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आपण सातत्याने संघर्ष करीत राहू, अशी भूमिका आमदार साजिद खान पठाण यांनी यावेळी स्पष्ट केली.
टीबी लॅब सुरू करण्याची मागणी
अकोला शहरासाठी २०२१ मध्ये मंजूर झालेली अत्याधुनिक क्षयरोग (टीबी) तपासणी प्रयोगशाळा अद्याप सुरू झालेली नसल्याचा मुद्दाही त्यांनी बैठकीत उपस्थित केला. आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध असतानाही आणि ११ पदांना मंजुरी मिळालेली असतानाही महानगरपालिका व जिल्हा क्षयरोग विभागातील समन्वयाअभावी ही प्रयोगशाळा सुरू होऊ शकलेली नाही. नागरिकांच्या आरोग्याशी निगडित हा गंभीर विषय तातडीने मार्गी लावण्याची मागणी त्यांनी केली. तसेच श्री राजराजेश्वर मंदिर आराखड्यासंदर्भात बैठक घेऊन आवश्यक धोरण लवकर जाहीर करावे, अशीही मागणी करण्यात आली.
५० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या २५० कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर
वार्ड क्रमांक ७ मधील तारफैल परिसरातील रेल्वे मार्गालगत सुमारे पन्नास वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांवर रेल्वे प्रशासनाने १ जून रोजी अतिक्रमण हटाव कारवाई केली. या कारवाईमुळे सुमारे २०० कुटुंबे बेघर झाली असून त्यांच्या समोर निवाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे याच कारवाईत गडंकी पोलिस प्रशिक्षण केंद्राजवळील भागातील सुद्धा ५० कुटुंबे बेघर झाली आहे.
या कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करून त्यांना ई-क्लास जमिनीवर घरे उपलब्ध करून देण्यात यावीत, अशी ठोस मागणी आमदार साजिद खान पठाण यांनी केली. यावर पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित प्रस्ताव तातडीने राज्य शासनाकडे पाठविण्यात येईल आणि पुनर्वसनासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा