missing-case-abhishek-raut-: अखेर बेपत्ता डॉक्टर तरुणाचा लागला शोध; अकोला पोलिसांच्या तांत्रिक तपासाला यश



भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला | नीलिमा शिंगणे जगड 

अकोला येथून बेपत्ता झालेल्या डॉक्टर तरुणाचा अखेर शोध लागला असून तो बीड जिल्ह्यात सुखरूप अवस्थेत नातेवाईकांच्या ताब्यात मिळाला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि रामदास पेठ पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासामुळे ही शोधमोहीम यशस्वी ठरली.

फिर्यादी दिगंबर अवधूत राउत (रा. वाडेगाव) यांनी दिनांक १ मे २०२६ रोजी त्यांचा मुलगा डॉ. अभिषेक राउत हा कोणालाही काहीही न सांगता अकोला शहरातील सातव चौक जवळील घरातून निघून गेल्याची तक्रार रामदास पेठ अकोला पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार मिसिंग क्रमांक २६/२०२६ नुसार नोंद करण्यात आली होती.


 या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना तातडीने तपासाचे निर्देश दिले.

तपासादरम्यान पोलिसांनी अभिषेकच्या मित्र-मैत्रिणींकडे सखोल चौकशी केली. तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यात आला. दिनांक ४ मे रोजी अभिषेकचे वडील, मावसभाऊ, आतेभाऊ आणि वाडेगाव येथील नागरिकांनी स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयात भेट देऊन पोलीस निरीक्षक शंकर शेळके आणि पीएसआय बोडखे यांच्याशी सविस्तर चर्चा केली.


यावेळी पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासाची माहिती नातेवाईकांना देण्यात आली. त्यानंतर ६ मे रोजी अभिषेक राउत हा बीड जिल्ह्यात सुखरूप आढळून आला.

प्राथमिक माहितीनुसार, अभिषेकने मोबाईल फोन स्विच ऑफ करून दुचाकीने शेगाव, नाशिकसह विविध देवस्थाने फिरल्याचे समोर आले. त्यानंतर तो आपल्या प्रेयसीकडे गेल्याची माहिती मिळाली. अखेरीस नातेवाईकांनी त्याला सुखरूप ताब्यात घेतले.


दिनांक ७ मे रोजी अभिषेक राउत आणि त्याचे नातेवाईक स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयात पोहोचले. यावेळी त्यांनी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, पोलीस निरीक्षक शंकर शेळके तसेच पीएसआय बोडखे यांचे आभार मानले.

ठळक मुद्दे

  • बेपत्ता डॉक्टर तरुणाचा अखेर शोध

  • बीड जिल्ह्यात सुखरूप अवस्थेत मिळाला

  • मोबाईल स्विच ऑफ करून देवस्थाने फिरल्याची माहिती

  • स्थानिक गुन्हे शाखेच्या तांत्रिक तपासाला यश

  • नातेवाईकांनी पोलिसांचे मानले आभार


टिप्पण्या