hidayat-patel-murder-case-trial: कॉंग्रेस नेते हिदायत पटेल खून प्रकरण; आरोपी राजू बोचे याचा जामीन अर्ज फेटाळला, अकोट न्यायालयाचा आदेश

अकोट सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश; दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर आरोपीने केला होता जामिनासाठी अर्ज




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोट (अकोला): कॉंग्रेस नेते हिदायतउल्ला खाँ पटेल यांच्या खून प्रकरणातील आरोपी राजू विठ्ठलराव बोचे (वय ५८, रा. यात्रा चौक, अकोट) यांचा जामीन अर्ज अकोट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हा आदेश दिला.


राजू बोचे यांच्याविरुद्ध अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ०५/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), १०९, ३(५) आणि ६१(२) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून, त्यानंतर आरोपीने जामिनासाठी अर्ज केला होता.


नेमके काय घडले?


सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, दि. ६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास मोहाळा येथे हिदायत पटेल यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती फिर्यादी फतेह अली खान यांनी पोलिसांना दिली.


फिर्यादीच्या जबानीनुसार, हिदायत पटेल हे रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले. त्यांना हल्ल्याबाबत विचारले असता, त्यांनी उबेद पटेल ऊर्फ राजीक ऊर्फ कालू पटेल याने मज्जीद मध्ये बसले असताना, मागून येऊन चाकूने गाल, पोट, पाठ, छाती व गुप्त अंग जवळ वार केल्याचे सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे.


हल्ल्यानंतर हिदायत पटेल यांना प्रथम अकोट येथील लोखंडे हॉस्पिटलमध्ये, त्यानंतर धांडे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथील ओझोन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.


मात्र, दि. ७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी हिदायत पटेल यांचा मृत्यू झाला. त्यानंतर दाखल गुन्ह्यात भारतीय न्याय संहितेचे कलम १०३(१) वाढविण्यात आले.


सरकारी पक्षाचा जामिनाला विरोध


जामीन अर्जाला विरोध करताना सरकारी वकील अजित देशमुख यांनी न्यायालयात लेखी उत्तर दाखल करून युक्तिवाद केला. सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, प्रकरण गंभीर स्वरूपाचे असून आरोपीला जामीन मिळाल्यास तो फिर्यादी किंवा साक्षीदारांवर दबाव अथवा धाक निर्माण करण्याची शक्यता आहे.


तसेच, आरोपीविरुद्ध सबळ पुरावे तपासात आढळून आल्याने तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला.


सरकारी पक्षाने पुढे असा मुद्दाही मांडला की, फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांमध्ये आरोपीविरुद्ध रोष असून जामीन मिळाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आरोपीला जामीन देऊ नये, अशी मागणी करण्यात आली.


दोन्ही पक्षांचा युक्तिवाद; न्यायालयाचा जामीन नाकारण्याचा आदेश


जामीन अर्जावर दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद करण्यात आला. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता अजित देशमुख यांनी बाजू मांडली, तर ॲड. मुन्ना खान यांनी त्यांना सहकार्य केले.


तपास अधिकारी पोलीस उपविभागीय अधिकारी निखील पाटील यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.


दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी आरोपी राजू विठ्ठलराव बोचे याचा जामीन अर्ज नामंजूर केला.


राजू बोचे हे दि. २७ एप्रिल २०२६ पासून अकोला कारागृहात न्यायालयीन बंदी म्हणून असल्याचे सरकारी पक्षाच्या माहितीत नमूद करण्यात आले आहे.


ठळक मुद्दे


- हिदायत पटेल खून प्रकरणातील आरोपी राजू बोचे यांचा जामीन अर्ज फेटाळला

- अकोट अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा आदेश

- न्यायाधीश बी. एम. पाटील यांच्यासमोर सुनावणी

- आरोपीविरुद्ध BNS कलम १०३(१), १०९, ३(५), ६१(२) अन्वये गुन्हा

- ७ जानेवारी २०२६ रोजी हिदायत पटेल यांचा मृत्यू

- तपास पूर्ण करून पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल

- सरकारी पक्षाने साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यता व्यक्त केली

- सरकारी पक्षातर्फे अजित देशमुख यांनी युक्तिवाद केला

- आरोपी २७ एप्रिल २०२६ पासून अकोला कारागृहात बंदी




News Highlights 

High profile murder case, अकोट, अकोला, हिदायतपटेल, राजूबोचे, खूनप्रकरण, जामीनअर्ज, सत्रन्यायालय, अकोटसत्रन्यायालय, कोर्टनिर्णय, CrimeNews, AkolaNews, AkotNews, CourtNews, BNS, BreakingNews

टिप्पण्या