mass-resignations-shiv-sena: शिवसेना उबाठाच्या पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे; पत्रकार परिषदेत सांगितली कारणे




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: शिवसेना उबाठाच्या वरिष्ठ जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बेताल वागण्यामुळे आपण आपापल्या पदाचे सामूहिक राजीनामे देत असून यापुढे पक्षाशी आपला कोणताच संबंध राहणार नसल्याची माहिती शिवसेना उबाठाचे विविध विभाग,प्रभाग, शाखा आदी प्रमुख पदाधिकाऱ्यानी दिली. 



शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषद मध्ये तब्बल 70 छोटे मोठे पदाधिकारी व महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षीय राजकारणात निष्ठावंत शिवसैनिकांना बाजूला करण्यात येत आहे. पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जिल्हास्तरीय नेत्यांनी प्रचार कार्य न करता उलट उमेदवारांना वाईट बोलून त्यांचा हिरेमोड करून इतर पक्षाच्या उमेदवारास निवडून आणण्यासाठी कार्य केले असल्याचा आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आला. 


पक्षाच्या नेत्यांनी अनेक प्रभागात डमी उमेदवार दिले. प्रभागात आपल्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी हे नेते फटकले सुद्धा नाहीत वा एखादी भेट सुद्धा दिली नाही. उलट तुमच्यात निवडून येण्याची लायकी नसल्याचे सांगून हिरमोड केला. त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाचे आयात व निवडणूक हरलेल्या व्यक्तीस स्वीकृत नगरसेवक करण्यात आले आहे. अशा मतलबी वागण्यामुळे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकारी कंटाळले असून म्हणून आपण सामूहिक राजीनामे देत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 


या पत्रकार परिषदेत शहर उपप्रमुख प्रकाश वानखडे, अंकुश शित्रे, विभाग प्रमुख संजय अण्णा पलेलू, उत्तर झोन प्रमुख अविनाश कोकरे, योगेश गवळी, सतीश नागदिवे, सतीश वानरे,अर्जुन शिरसागर, रोशन अहिर, नितीन देशमुख, ख्वाजा गुलाम फारूक समवेत बहुसंख्य महिला पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या