सुरक्षेसाठी हेल्मेट अनिवार्य, तर संघटनांची मागणी – आधी रस्ते दुरुस्त करा; शहरात हेल्मेट खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी
ठळक मुद्दे
अकोला जिल्ह्यात आजपासून हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी.
विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या सुमारे हजार वाहनचालकांवर पोलिसांची कारवाई.
सामाजिक संघटनांचा विरोध – आधी रस्त्यांवरील खड्डे बुजवा, नंतर हेल्मेट सक्ती करा.
हेल्मेट खरेदीसाठी शहरातील दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी.
बाजारात निकृष्ट दर्जाच्या हेल्मेटची विक्री होत असल्याची चिंता व्यक्त.
भारतीय अलंकार न्यूज 24
अकोला : नीलिमा शिंगणे जगड
राज्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने सुरू आहे. नागपूर आणि अमरावतीनंतर आता अकोला जिल्ह्यातही आजपासून दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली आहे. या निर्णयानुसार विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्या चालकांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केली असून पहिल्याच दिवशी सुमारे हजार वाहनचालकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
शहरातील प्रमुख चौक, सिग्नल आणि गर्दीच्या मार्गांवर वाहतूक पोलिसांची विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना दंड ठोठावण्यात येत असून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी नागरिकांच्या सुरक्षेलाच सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगत, प्रत्येक दुचाकीस्वाराने दर्जेदार हेल्मेटचा वापर करावा आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
मात्र, हेल्मेट सक्तीच्या निर्णयाला काही सामाजिक संघटनांनी विरोध दर्शविला आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे असून रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असल्याने अपघातांना केवळ हेल्मेटचा अभाव नव्हे तर निकृष्ट रस्तेही तितकेच जबाबदार असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष देवा गावंडे यांनी प्रशासनाकडे मागणी करताना, "आधी शहरातील रस्त्यांची दुरुस्ती, खड्डे बुजविणे आणि वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी दूर कराव्यात. त्यानंतरच हेल्मेट सक्तीची कठोर अंमलबजावणी करावी," अशी भूमिका मांडली.
दरम्यान, हेल्मेट सक्ती लागू होताच अकोला शहरातील हेल्मेट विक्रेत्यांच्या दुकानांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. नियमांचे पालन करण्यासाठी अनेकांनी हेल्मेट खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, बाजारात निकृष्ट दर्जाची हेल्मेटही विकली जात असल्याने नागरिकांनी दर्जेदार आणि प्रमाणित हेल्मेटच खरेदी करावे, असा इशारा स्वयंसेवी संस्थेचे सदस्य अनुराग चौहान यांनी दिला आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टीने हेल्मेटचा वापर अत्यंत महत्त्वाचा असून अपघातात जीव वाचण्याची शक्यता त्यामुळे वाढते, हे वास्तव आहे. मात्र दुसरीकडे शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि हेल्मेट सक्ती या मुद्द्यावरून अकोल्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी नियमांची अंमलबजावणी करत असताना, नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडेही तितक्याच गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.
आता हेल्मेट सक्तीला अकोलेकर कितपत प्रतिसाद देतात आणि विरोध करणाऱ्या संघटनांच्या मागण्यांवर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा