- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
breaking-news-sajid-pathan-akl : खंडणी प्रकरण : आमदार साजिद खान पठाण यांना जीवे मारण्याची धमकी; विधानसभेत वडेट्टीवार संतापले 'वाय' दर्जाची सुरक्षा देण्याची मागणी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा आरोप करत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत जोरदार हल्लाबोल केला. अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगच्या नावाने १० कोटी रुपयांची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा गंभीर मुद्दा त्यांनी सभागृहात उपस्थित केला.
१७ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास आमदार पठाण यांना आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन आला. स्वतःला बिश्नोई गँगशी संबंधित शुभम लोणकर असल्याचे सांगत संबंधित व्यक्तीने १० कोटी रुपयांची उघड मागणी केली. पैसे न दिल्यास गोळ्या घालून ठार मारू, अशी थेट धमकी देण्यात आली. “पोलिसांना सांगितले तरी काही उपयोग नाही; काही महिन्यांनी आम्ही काम तमाम करू,” अशा शब्दांत आमदारांना धमकावण्यात आल्याचे वडेट्टीवार यांनी संतापाने सांगितले.
सभागृहात बोलताना वडेट्टीवार म्हणाले, “राज्यात लोकप्रतिनिधीच सुरक्षित नसतील, तर सामान्य जनतेची काय अवस्था असेल? दिवसाढवळ्या धमक्या दिल्या जात आहेत. गँगस्टरचे नाव घेऊन आमदारांना लक्ष्य केले जाते, ही अत्यंत धक्कादायक बाब आहे.” धमकीचा ऑडिओ ऐकला तर अंगावर काटा येतो, असेही त्यांनी नमूद केले.
साजिद पठाण यांचा कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमीशी संबंध नसताना त्यांना लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप करत वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. “सरकार झोपले आहे का? लोकप्रतिनिधींनाच संरक्षण नसेल तर राज्य चालवायचे कसे?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत विधानसभा अध्यक्षांनी सरकारला तात्काळ कारवाईचे निर्देश दिले. संबंधित आमदारांना कडक सुरक्षा देऊन धमकी प्रकरणाचा छडा लावावा, अशी मागणी सभागृहातून करण्यात आली.
बिश्नोई टोळीकडून काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांना १० कोटीच्या खंडणीसाठी धमकीचा फोन आला होता. आमदार पठाण यांनी खंडणीसंदर्भात तक्रार दाखल केली आहे. सतर्कता म्हणून आमदार पठाण यांना सशस्त्र पोलिसांची सुरक्षा पुरवठण्यात आली.दरम्यान, बिश्नोई टोळीने आ.पठाणांना दिलेल्या धमकीची ध्वनीफित समाज माध्यमातून प्रसारित झाली आहे.
बिश्नोई टोळीचा हस्तक शुभम लोणकर याची धमकी!
भाजप आमदार प्रकाश भारसाकळे (अकोट) यांना बिश्नोई टोळीकडून खंडणीसाठी धमकी आली. त्यानंतर अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना देखील धमकीचा फोन आला.
बिश्नोई टोळीतील हस्तक शुभम लोणकर याने आमदार पठाण यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. १७ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजताच्या सुमारास हा कॉल आला होता. ''दोन दिवसांत १० कोटी रुपये दे, अन्यथा तुझा गेम करू, अशी धमकी शुभम लोणकर याने दिली. या प्रकरणानंतर आमदार साजिद खान पठाण यांच्या सुरक्षेत वाढ केली. या घटनेच्या सात दिवसानंतर साजिद खान पठाण यांना दिलेल्या धमकीची ध्वनीफित समाजमाध्यमातून मंगळवारी व्हायरल झाली. त्यामुळे अकोला सह महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची आणि रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई टोळीतील शुभम लोणकर याने स्वीकारली आहे. शुभम लोणकर हा मूळ अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील नेव्होरी गावाचा रहिवासी होता. या आधीही शुभम लोणकर याच्यावर अकोला पोलिसांनी कारवाई करीत पिस्तुल आणि काही जिवंत काडतूस जप्त केले होते.
लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कातील शुभम लोणकरला बंदूक तस्करी प्रकरणात अकोला पोलिसांनी अटक केली होती. बिश्नोई टोळीतील तो प्रमुख हस्तक आहे. त्याची मुंबईसह इतर भागामध्ये दहशत पसरली आहे. आता त्याने अकोल्यातील दोन आमदारांना खंडणीसाठी फोन करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने चांगलीच खळबळ उडाली.
आ. साजिद खान पठाण यांना जीवे मारण्याची धमकी
‘वाई प्लस’ सुरक्षेची काँग्रेसची मागणी ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याच्या गंभीर प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रशासनावर जोरदार दबाव आणत तात्काळ ‘वाई प्लस’ (Y+) दर्जाची सुरक्षा देण्याची आक्रमक मागणी केली आहे.
जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर व महानगर अध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देत संताप व्यक्त केला.
“लोकप्रतिनिधींनाच धमक्या मिळत असतील तर सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा कोण करणार?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. अलीकडे गुन्हेगारी टोळ्यांकडून, विशेषतः कथित बिश्नोई गँगकडून धमक्या दिल्या जात असल्याच्या घटनांनी राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आमदार पठाण यांना मिळालेली धमकी ही केवळ एका व्यक्तीविरुद्धची बाब नसून लोकशाही व्यवस्थेलाच दिलेले आव्हान असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले.
निवेदनात आमदार पठाण यांना तात्काळ उच्चस्तरीय पोलीस सुरक्षा देण्याची, विद्यमान सुरक्षेचा आढावा घेऊन ‘वाई प्लस’ दर्जासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची तसेच धमकी देणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून राज्य व केंद्रीय गुप्तचर यंत्रणांशी समन्वय साधण्याचीही मागणी करण्यात आली.
दरम्यान, या घटनेमुळे अकोला जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाने तात्काळ ठोस पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
यावेळी बबनराव चौधरी, प्रदीपकुमार वखारिया, कपिल रावदेव, तश्वर पटेल, मो. युसुफ मो. इलियास, विजय पचारे, मोहम्मद इरफान, शे. इब्राहिम शे. कासम, याकूब खान, हुसेन चौधरी, मोईन खान, मेहबूब खान, आर्किटेक निलोफर खान सोहेल खान, निखत शाहीन अहमद कुरेशी, कनिश खातून मो. इलियास, आर्शिया परवीन मो. शारिक, सैय्यद यासीन, शेख अब्दुल्लाह, सैय्यद अहमद, सैय्यद शहजाद सज्जू भाई यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. साजीद खान पठाण यांच्या सुरक्षावाढीसाठी निवेदन
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांना मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेत तात्काळ वाढ करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) अकोला पश्चिमच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, आमदार पठाण यांना मिळालेली धमकी ही अत्यंत गंभीर बाब असून त्यामुळे जनप्रतिनिधींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा प्रकारच्या धमक्यांमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अलिकडील काळात विविध गुन्हेगारी टोळ्यांकडून, विशेषतः कथित बिश्नोई गँगकडून दिल्या जाणाऱ्या धमक्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले.
आमदार पठाण यांना तात्काळ उच्चस्तरीय सुरक्षा देण्यात यावी तसेच त्यांच्या सुरक्षा श्रेणीत वाढ करून ‘वाय प्लस’ (Y+) सुरक्षा देण्यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच धमकी देणाऱ्या संबंधित व्यक्ती किंवा टोळीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी व संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून आवश्यक असल्यास राज्य व केंद्रीय गुप्तचर यंत्रणांशी समन्वय साधावा, अशीही मागणी करण्यात आली.
“जनप्रतिनिधींची सुरक्षा ही लोकशाहीची सुरक्षा आहे. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने ठोस पावले उचलावीत,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. हे निवेदन कार्याध्यक्ष सैयद युसुफ अली यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम विधानसभा अध्यक्ष महेमुद खान पठाण, अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष वसीम खान, पप्पू खान, आवेज खान, युसुफ बेग, अमीन खान, आसिफ भाई आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आले.
अकोला
शुभम लोणकर
साजीद खान पठाण
Akola
Breaking news
congress
lawrence bishnoi
sajid khan pathan
shubham lonkar
vijay vadattiwar
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा