municipal-corporation-election: मुख्य निवडणूक निरीक्षक यांनी घेतला मतदान कार्यवाहीचा आढावा; मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मनपा सज्ज



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या अनुषंगाने आज  9 जानेवारी  रोजी मुख्य निवडणूक निरीक्षक अर्पित चौहान यांनी मनपा आयुक्त यांच्या दालनात आजपर्यंत झालेल्या नियोजनाबाबत तसेच तयारी बाबत आढावा सभा घेतली.        


            

यावेळी मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. सुनिल लहाने यांच्याव्दारे मुख्य निवडणूक निरीक्षक  अर्पित चौहान आणि सहायक निवडणूक अधिकारी ब्रिजेश पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मनपा आयुक्त डॉ.लहाने यांनी पीपीटीच्या माध्यमातून अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मनपा प्रशासनाव्दारा करण्यात आलेले नियोजन आणि संपुर्ण मतदान प्रक्रियेसाठी नियोजित आराखडानुसार माहिती दिली.



            

तसेच यावेळी मुख्य निवडणूक निरीक्षक  अर्पित चौहान यांनी आचार संहिता पथक, मतदान सी.यू. युनिट आणि बी.यू. युनिट बाबत, स्ट्राँग रूम/मतमोजणी केंद्र आणि लागणारा मनुष्यबळ, संवेदनशील मतदार केंद्र, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मागणीनुसार बीयू युनीटचे 100 टक्के पुरवठा आदींबाबत माहिती घेतली. तसेच मतमोजणी प्रक्रिया 6 ठिकाणी होणार असून पत्रकारांना मतमोजणी संदर्भातील संपूर्ण माहिती एकत्रित एकाच ठिकाणावरून मिळावी याकरीता उपाययोजना करण्याकरिता मुख्य निवडणूक निरीक्षक यांनी निर्देश दिले.   



            

यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने, मुख्य निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी सतीष गावंडे मुख्याधिकारी तेल्हारा, तसेच सर्व निवडणूक‍ निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी आदींची उपस्थिती होती.  



मुख्य निवडणूक निरीक्षक यांच्याव्दारे करण्यात आली मतदान केंद्रांची आणि स्ट्राँग रूम ची  पाहणी 


अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या अनुषंगाने आज 9 जानेवारी 2026 रोजी मुख्य निवडणूक निरीक्षक अर्पित चौहान यांच्याव्दारे अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अकोला महानगरपालिका प्रशासनाव्दारा स्ट्राँग रूम/ मतमोजणी केंद्रांची आवश्यक असलेली सर्व सुसज्ज व्यवस्था बाबत पाहणी करण्यात आली.


            

यावेळी मुख्य निवडणूक निरीक्षक  अर्पित चौहान यांनी झोन क्रं. 1 अंतर्गत अकोला जिल्हा मराठा मंडळ, रामदास पेठ, झोन क्रं. 2 अंतर्गत शासकीय धान्य गोडाऊन, जिल्हाधिकारी कार्यालय, झोन क्रं. 3 अंतर्गत निमवाडी पोलीस वसाहत येथील मल्टीपर्पज हॉल, झोन क्रं.4 अंतर्गत राजमाता जिजाऊ अभियंता प्रशिक्षण केंद्र रेल्वे स्टेशन जवळ, झोन क्रं. 5 अंतर्गत जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन, सिव्हील लाईन आणि झोन क्रं. 6 अंतर्गत शासकीय गोडाऊन, खदान यांचेसह मतदान केंद्रांची संख्या जास्त असलेली ईमारत ज्यामध्ये डाबकी रोड येथील मनपा उच्च प्राथमिक शाळा क्रं. 10, आकोट फैल येथील मनपा मराठी मुलांची शाळा क्रं. 6, मनपा हिंदी बालक शाळा क्रं. 2, सिंधी कॅम्प येथील सिंधी हिंदी शाळा, मोठी उमरी येथील जि.प.प्राथमिक मराठी केंद्र शाळा क्रं. 1 आदी ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून महानगरपालिका प्रशासनाव्दारा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनंषंगाने केलेल्या सर्व व्यवस्थाबाबत समाधान व्यक्त केले.



            

यावेळी मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ.सुनिल लहाने, अतिरिक्त आयुक्त तथा मनपा सार्वत्रिक निवडणूक नोडल अधिकारी सुमेध अलोने, मुख्य निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी सतीष गावंडे, मनपा बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय गुजर, महानगरपालिका सचिव अमोल डोईफोडे, मनपा आयुक्त यांचे स्वीय सहायक जितेंद्र तिवारी आदींची उपस्थिती होती.


मतदान चिठ्ठी वितरण संदर्भात बैठक

अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या अनुषंगाने मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ.सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये तसेच मनपा अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने यांच्या मार्गदर्शनात 8 जानेवारी 2026 रोजी अकोला महानगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृह येथे मनपा उपायुक्त विजय पारतवार यांच्याव्दारे मतदानाचा टक्केवारी मध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने मतदान केंद्र पर्यवेक्षक यांची मतदान चिठ्ठी वितरण संदर्भात बैठक संपन्न झाली आहे.



या बैठकीमध्ये अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 अन्वये अकोला महानगरपालिका व्दारा विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत असून प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेकरीता आवश्यक असलेल्या मतदान स्लीप वाटप करण्याचे कार्यही आवश्यक असून अकोला महानगरपालिकेच्या एकूण 20 प्रभागांसाठी मतदार यादीवर काम करणारे 50 पर्यवेक्षकांना तसेच त्यांच्या अधिनस्त 500 बी.एल.ओ. आणि 150 आशा वर्कर असे एकुण 650 कर्मचा-यांच्या माध्यमातून मतदान चिठ्ठी वितरण करण्यात येणार असून सदरचे काम  9 जानेवारी पासून ते 13 जानेवारी 2026 पर्यंत पुर्ण करणे, तसेच या संदर्भात मतदारांना 100 टक्के सहकार्य करणे आदींबाबात सुचना मनपा उपायुक्त विजय पारतवार यांनी यावेळी दिली आहे.



या बैठकीत मनपा उपायुक्त  विजय पारतवार, निवडणूक विभाग प्रमुख अनिल बिडवे, छपाई साहित्य नोडल अधिकारी तथा शहर अभियान व्यवस्थापक संजय राजनकर, मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अनुप चौधरी, जनसंपर्क अधिकारी भरत शर्मा यांचेसह सर्व पर्यवेक्षकांची उपस्थिती होती.    



अकोला महानगरपालिकेच्या विविध शाळेच्या विद्यार्थ्यांव्दारे रॅलीच्या माध्यमातून मतदार जनजागृती


अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 अनुषंगाने अकोला महानगरपालिका क्षेत्रात मतदान जनजागृती करण्यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये तसेच मनपा अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने यांच्या मार्गदर्शनात विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असून या अनुषंगाने  8 जानेवारी 2026 रोजी अकोला महानगरपालिकेच्या विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांव्दारे मतदान जनजागृती रॅली, काढून शाळापरिसरांमध्ये मतदान जनजागृती करण्यात आली आहे. या रॅलींच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदानाचे महत्त्व, लोकशाहीतील सहभाग आणि जबाबदार मतदाराची भूमिका याबाबत जागृत करण्यात येत आहे.


या जनजागृती रॅलीमध्ये महानगरपालिका गुजराती शाळा क्रमांक 1, महानगरपालिका सिंधी हिंदी शाळा क्रमांक 1, आर्य समाज मंदिर, डीएव्ही कॉन्व्हेंट अकोला तसेच स्वावलंबी विद्यालय अशा 5 शाळांचा समावेश होता. सदर रॅलीची सुरूवात मनपा शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी मतदार जनजागृती हरिश्चंद्र इटकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली.


यावेळी नोडल अधिकारी नईम फरास, मुख्याध्यापक गजेंद्र ढवळे, मुख्याध्यापक युवराज पठाडे , हरीश शर्मा, राहुल ठाकूर, विपुल राणा यांचे सह सर्व शाळांचे शिक्षक तसेच पालक वर्गाची उपस्थिती होती.

टिप्पण्या